- समीर देशपांडे कोल्हापूर - भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज २६ व उदया २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्याचमुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत उपस्थित रहावयाचे असून आपत्कालीन कामकाज करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील राधानगरी, दुधगंगा, वारणा व तुळशी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या धोका पातळीला वाहत आहेत, त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाणी येत आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेमधील सर्व विद्यार्थ्यांना आज, उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली.