कोल्हापूर : नागरिकांना वाहतूक शिस्तीचे धडे देणाऱ्या शहरातील वाहतूक शाखेच्या ११० पोलिसांना बुधवारी हेल्मेटचे वाटप करण्यात आले. नागरिकांना हेल्मेट सक्ती करण्याअगोदर स्वत:पासून त्याची सुरुवात करावी, हा उद्देश समोर ठेवून पोलिसांना हेल्मेटचे वाटप करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले.
यापुढे वाहन चालविताना हेल्मेट न वापरणाऱ्या पोलिसांवरही कारवाई केली जाणार आहे. हा नियम फक्त पोलिसांना नव्हे, तर नागरिकांनाही लागू आहे; त्यासाठी त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही गुजर यांनी केले आहे.वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघाती मृत्यूंची संख्या वाढत आहे. अनेकांना शारीरिक अपंगत्व आले आहे. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी वेळोवेळी पोलीस दलाच्या वतीने प्रबोधन केले जात आहे. महामार्गावर दुचाकीस्वारास हेल्मेट सक्ती केली आहे. हा नियम अद्याप शहरात लागू केला नव्हता; परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे.
नागरिकांना हेल्मेट सक्ती करण्याअगोदर स्वत:पासून त्याची सुरुवात करावी, हा उद्देश समोर ठेवून बुधवारपासून सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक पोलिसांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. सर्व पोलिसांना यापुढे हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे.
प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे काळाची गरज आहे. त्याची सुरुवात पोलिसांपासून करण्यात आली आहे. हा नियम सर्वांना लागू असून, नागरिकांनीही दुचाकी चालविताना हेल्मेट वापरून सहकार्य करावे, असे आवाहन गुजर यांनी केले आहे.