कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि वाचनसंस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या करवीर नगर वाचन मंदिर या पुरातन वास्तूच्या प्रिन्स शिवाजी हॉलच्या उभारणीसाठी दानशूर कोल्हापूरकरांच्या मदतीचा हात हवा आहे.
सदर वास्तूसह सुसज्ज ग्रंथालय उभारणीसाठी सव्वाचार कोटी रुपये लागणार आहेत. वास्तू उभारणीचे हे शिवधनुष्य पेलण्यासाठी कोल्हापूरकरांनी यथाशक्ती सहकार्य करावे, असे आवाहन संचालकांनी केले आहे. त्यासाठी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शुक्रवारपासून निधी संकलन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.वाचनसंस्कृतीची मोठी परंपरा लाभलेल्या करवीर नगर वाचन मंदिराने यंदा १६८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. संस्थेमध्ये सध्या दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखितांसह दीड लाख ग्रंथसंपदा, तर साडेतीन हजारांच्या वर सभासद आहेत.
देशातील सर्वांत जुन्या ग्रंथालयांमध्ये ‘कनवा’चा वरचा क्रमांक लागतो. संस्थेच्या विद्यमान संचालकांच्या वतीने अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्या जात असून, गेल्या तीन वर्षांत जुन्या इमारतींचे नूतनीकरण, आधुनिक कपाटे, साखळी वाचनालय, अभ्यासिका असे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला प्रिन्स शिवाजी हॉल पूर्वी होता त्याच रूपात पुन्हा उभारण्यात येणार आहे. सध्या संस्थेचा स्वनिधी व दानशूरांच्या मदतीतून ६५ लाखांच्या रकमेत वास्तूच्या बांधकामाचे दोन स्लॅब तयार झाले आहेत. या वास्तूत पार्किंग, समोर प्रिन्स शिवाजी हॉल, मागील तीनमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर अभ्यासिका, आर्ट गॅलरी, दुसऱ्या मजल्यावर रेडिओ स्टेशन, कॉन्फरन्स हॉल, अभ्यासिका अशी विविध दालने असणार आहेत.
या पूर्ण प्रकल्पासाठी सव्वाचार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा निधी जमा करण्यासाठी संचालक मंडळाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी उद्योगपती, डॉक्टर, इंजिनिअर अशा समाजातील प्रतिष्ठित नागरिकांसह निधी देणाºया सामाजिक संस्था तसेच शासनाकडेही प्रस्ताव पाठविला आहे.कोल्हापुरातील सर्वसामान्यांपासून ते ग्रंथांसाठी, वाचन चळवळीसाठी झटणाऱ्या व्यक्तींचा सहभाग यात असावा, यासाठी संस्थेच्या वतीने निधी संकलन उपक्रम सुरू करण्यात येत आहे. त्यात प्रत्येक व्यक्ती आपल्याला जमतील तितक्या रकमेची मदत दानपेटीत टाकू शकते. तरी दानशूर कोल्हापूरकरांनी निधीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूरच्या लौकिकात मानाचा तुरा ठरेल अशा प्रिन्स शिवाजी हॉलची उभारणी हेच संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी फार मोठा निधी लागणार आहे. या निधी संकलनासाठी आमचे सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. दानशूर कोल्हापूरकरांचे सहकार्य मिळाले तर लवकरात लवकर आम्ही वास्तू उभारू शकू.- सतीश कुलकर्णी (कार्यवाह)