कोल्हापूर : क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज यांचा रक्तरंजित इतिहास साहित्यातून विकसित करून तो लोकांपर्यंत पोहोचविल्यास आजच्या युवा पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे उद्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज यांना अभिवादन व ‘सीपीआर’समोरील क्रांती उद्यान लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार अमल महाडिक हे होते. क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज सांस्कृतिक मंडळ, केएसबीपी, सिटीझन फोरम आणि अकबर मोहल्ला सामाजिक मंडळ यांच्या संयुक्ततेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, क्रांतिवीर चिमासाहेब महाराज यांच्या क्रांतीकारक आठवणी सतत जागे ठेवण्याचे काम या उद्यानातून सुरू होते. चिमासाहेब महाराज यांनी गाजविलेला इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.
शिक्षणमंत्र्याशी बोलून चिमासाहेब यांचा रक्तरंजित इतिहास पाठ्यपुस्तकात घेण्याबाबत चर्चा करू त्याशिवाय तो इतिहास साहित्यातून आजच्या युवापिढीपर्यंत पोहोचविल्यास तो खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरेल. शहराच्या कॉलन्यांतील आरक्षित खुल्या जागेत उद्याने विकसित करण्यासाठी ‘केएसबीपी’ नेहमीच आपल्यासोबत आहे असेही ते म्हणाले.
राजकारण नको, समाजकारण करा.‘केएसबीपी’वर पैसे मिळवित असल्याचा आक्षेप होत होता. महापालिकेकडे प्रस्ताव ठेवल्यानंतर काहींना त्याचा आर्थिक वास आला, त्यांनी विरोध केला. पण ‘केएसबीपी’ संस्था शांत बसलेली नाही, त्यांनी विकसनशीलतेचा ध्यास घेतला आहे. राजकारण बाजूला ठेवून समाजकारणासाठी विकास स्विकारा, असेही आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
आता मुलांसाठी मोफत सहल‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ ही पर्यटनवाढीसाठी संकल्पना सत्यात उतरली. आता शहरातील ८ ते १५ वयोगटातील १०० विद्यार्थ्यांसाठी शहरातील दुर्लक्षित प्रेरणादायी ठिकाणे माहिती देण्याची एक दिवसांची सहल डिसेंबरपासून सुरू करणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी जाहीर केली.