विश्र्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमधील जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी सोमवारी (दि. ३०) हातात हात घेऊन एकीची ग्वाही दिली. सुरुवात तरी चांगली झाली आहे; परंतु नुसते हातात हात घेऊन पुरेसे नाही. या सर्व नेत्यांचे मनोमिलन किती एकजीव होते, यावरच जिल्ह्यातील काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे.
पी.एन. - आवाडे गटात एकी झाली तरी पी.एन. व आमदार सतेज पाटील यांच्यातील अंतर्गत संघर्षही तितकाच महत्त्वाचा आहे. या दोन नेत्यांनीही दोघांतील अविश्वासाची दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. काँग्रेस एकसंध झाली तर विधानसभेच्या दहापैकी पाच जागांवर या पक्षांला संधी आहे. म्हणजे शुन्यावरून थेट पाचपट यश मिळू शकते.पी.एन.-आवाडे वादात पक्षाचे मोठे नुकसान झालेच; परंतु त्यात राहुल पाटील यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही हुकले. हा वाद नसता किंवा त्यावेळी या नेत्यांनी थोडा जरी मनाचा मोठेपणा दाखविला असता तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचा झाला असता. परंतु सत्ता गेली तरी बेहत्तर, परंतु मी कुणाच्या दारात जाणार नाही, ही सरंजामी वृत्ती पक्षाच्या मुळावर उठली. त्यात नेत्यांचेही व पक्षाचेही नुकसान झाले.
जिल्हाध्यक्ष पदावरून या दोन नेत्यांतील वाद २०१० पासून जास्त चिघळला. तसे या दोन नेत्यांचे आवाडे-आवळे यांचे आहेत, तसे विधानसभा मतदारसंघ अथवा संघर्ष होईल, असे जवळचे कार्यक्षेत्र नाही; परंतु तरीही जिल्हा काँग्रेसवर वर्चस्व कुणाचे यातून यांच्यातील दुही वाढत गेली. आवाडे व जयवंतराव आवळे यांच्यातील संघर्ष हा जास्त टोकाचा होता. त्यामागेही वर्चस्वाचेच राजकारण कारणीभूत होते.
या संघर्षाचा परिणाम म्हणून आवळे गटच राजकारणातून बेदखल झाला. पी.एन. - आवाडे किंवा आवाडे-आवळे यांच्यात वितुष्ट होते, त्यात नक्कीच पक्षाचे नुकसान झाले; परंतु त्याच्याहीपेक्षा जास्त नुकसान सतेज पाटील - पी.एन. पाटील यांच्यातील संघर्षाने होत आहे व होणार आहे. त्यामुळे सोमवार (दि. ३०)चे झालेले मनोमिलन तसे अर्धेच आहे.
खरे मनोमिलन हे या दोन नेत्यांत होण्याची गरज आहे; कारण जिल्हा काँग्रेसच्या मुख्य धारेतील हे दोन ताकदीचे नेते आहेत आणि त्यांच्यात अंतर्गत बेबनाव राहिला तर त्यातून पक्ष दुभंगतो. आता तीच स्थिती आहे. त्यामुळे या दोन नेत्यांचा व्यवहार कसा राहतो, हे जास्त महत्त्वाचे आहे. त्याला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची एक दुखरी बाजू आहे.
आगामी काळात निवडणुका आहेत व उमेदवारी निश्चित करताना जिल्हाध्यक्षांची शिफारस काँग्रेसमध्ये महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे काही झाले तरी पी.एन. पाटील यांना हे पद सोडायचे नाही. असे झाले तर काँग्रेसमधील एकी किती अभेद्य राहते, हाच कळीचा मुद्दा आहे. या दोन नेत्यांतील एकीला माजी आमदार महादेवराव महाडिक व पी.एन. यांच्यातील मैत्रीचा एक पदर आहे. पी.एन.-महाडिक हे दोघे गोकुळमध्ये एकत्र आहेत.
पी.एन. यांना सोबत घेतल्याशिवाय गोकुळचा गाडा एकट्याच्या ताकदीवर हाकता येत नाही, हे महाडिक हेदेखील जाणून आहेत. गोकुळ ही नुसती सत्ता नाही, ती मोठी आर्थिक ताकद आहे. त्यामुळे तिथेच सगळे घोडे पेंड खाते. त्या सत्तेतील महाडिक यांची रसद तोडायची, हा सतेज पाटील यांचा महत्त्वाचा कृती कार्यक्रम आहे. पक्ष की गोकुळ असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा गोकुळलाच पसंती दिले जाते; त्यामुळे सतेज-पी.एन. यांच्या मनोमिलनातील गोकुळ हा अडसर आहे.जिल्हा काँग्रेसची सध्याची स्थिती पक्षाच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधी नव्हती इतकी खालावलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पुरता सुपडासाप झाला होता व त्यावेळीही पक्षाला एकही जागा निवडून आणता आली नव्हती. तशीच स्थिती सध्याची आहे. विधानसभेत दहापैकी एकही आमदार नाही. दोनपैकी एकही खासदार नाही. जिल्हा परिषद, बाजार समितीत सत्ता नाही.
कोल्हापूर जिल्हा दूध संघात (गोकुळ) सत्ता असली तरी ती पक्षापेक्षा नेत्यांची आहे. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर इतकीच पक्षाला सांगण्यासारखी जमेची बाजू आहे. जिल्ह्यातील संघटन पुरते विस्कळीत झाले आहे. तालुकाध्यक्ष कोण आहेत, हे लोकांनाच काय, त्या पक्षातील कार्यकर्त्यांनाही माहीत नाही.
कोल्हापूर महापालिकेसह नगरपालिकांच्या शहरातही काँग्रेसचा कुठेही ब्लॉक कमिटीचा एकही साधा फलक दिसत नाही. होय, मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, असे म्हणणारा माणूस भेटत नाही. केंद्रात व राज्यात पक्षाची सत्ता नसल्याने निधीची चणचण आहे. कार्यकर्त्यांनाच चार्ज होईल असा कोणताही कार्यक्रम नाही. अशा स्थितीत मरगळलेल्या काँग्रेसमध्ये सोमवारच्या घटनेने जान आणण्याचे काम नक्की झाले.
उशिराने का असेना, सर्वच नेत्यांना शहाणपण सुचले हे बरे झाले; कारण आता त्यांनी हा शहाणपणा दाखविला नसता तर त्यांचे राजकीय अस्तित्वच संपणार होते. त्यामुळे त्याच अपरिहार्यतेच्या दबावापोटी का असेना, त्यांनी आमच्यातील संघर्ष संपल्याचे जाहीर करून एकीची हाक दिली आहे. त्यामुळे या मनोमिलनाचे स्वागतच आहे; परंतु हे मनोमिलन नुसते हात उंचावून फोटोला पोज देण्यापुरतेच मर्यादित राहू नये, ही अपेक्षा काँग्रेसजनांतून व्यक्त होत आहे.
नेत्यांत दुही असली तरी जिल्ह्यांत आजही काँग्रेसच्या विचारधारेबध्दल आपुलकी असणारा मोठा वर्ग आहे. नेत्यांनी एकजुटीने त्यांना हाक दिली तरी पक्षाला गतवैभव मिळू शकते. आणि हे नाही केले तर पक्षाबरोबरच नेतेही अस्तित्वहीन होणार आहेत हे सांगायला कुण्या जोतिष्याची गरज नाही.खरी मेख...राज्यात काँग्रेसची सत्ता यावी..त्यात मला मंत्रिपद मिळावे परंतू जिल्ह्यांत मला कुणी स्पर्धक असू नये या वृत्तीने आजपर्यंत काँग्रेसचे जास्त नुकसान झाले आहे. या पाडापाडीच्या राजकारणाचाही फटका पक्षाला बसला आहे.