कोल्हापूर : राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत काढण्यात आलेल्या शिष्यवृत्तीसंदर्भातील परिपत्रक रद्द करावे, या मागणीसाठी गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे समाजकल्याण कार्यालयासमोर परिपत्रकाची होळी करून निदर्शने करण्यात आली.
यावेळी ‘अभाविप’च्या कोल्हापूर शाखेतर्फे समाजकल्याण अधिकाऱ्यांना श्ष्यिवृत्तीसंदर्भातील समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. शिष्यवृत्तीसंदर्भात येत्या आठ दिवसांत सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्यात यावी. दि. २९ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार आॅफलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेताना घेण्यात येणारे बंधपत्र रद्द करून, प्राचार्यांच्या स्वाक्षरीचे हमीपत्र घेण्यात यावे, तसेच श्ष्यिवृत्ती जमा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या शुल्काची मागणी करू नये, या विषयात सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
याबाबत निर्णय न झाल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन करील, असा इशारा देण्यात आला. यावेळी सहमंत्री साधना वैराळे, शाहूनगर मंत्री भरत रावण, जिल्हा संयोजक श्रीनिवास सूर्यवंशी, सोहम कुऱ्हाडे, गायत्री पाटील, अविराज माने, आदी उपस्थित होते.