संतोष मिठारीकोल्हापूर : परीक्षकांची नियुक्ती, जिल्हा आणि मध्यवर्तीचे नियोजन, खर्चासाठी निधीची उपलब्धता आणि विद्यार्थी कलाकारांना गुण देणे, आदींबाबतचे बदल शिवाजी विद्यापीठाने स्वीकारल्यास युवा महोत्सवातील रंगत आणि स्पर्धा आणखीन वाढणार आहे.महाविद्यालयीन आणि विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठातर्फे जिल्हास्तरीय आणि मध्यवर्ती युवा महोत्सव घेण्यात येतो. जिल्हास्तरीय महोत्सवाचे ३८ वे, तर मध्यवर्ती युवा महोत्सवाचे यंदा ३५ वे वर्षे आहे. स्पर्धांच्या स्वरूपातील बदल स्वीकारून विद्यापीठाने महोत्सवाची व्याप्ती वाढविली; मात्र, गेल्या काही वर्षांपासून या महोत्सवाला एक साचेबद्धपणा आल्यासारखे झाले आहे.
परीक्षक, नियोजनात तोच-तोचपणा दिसत आहे. ते टाळण्यासाठी विद्यापीठाने काही बदल स्वीकारणे आवश्यक आहे. दोन ते तीन स्पर्धांच्या परीक्षणाचे काम अनेकदा एकाच परीक्षकांवर सोपविले जाते. परीक्षकांची नियुक्ती करताना ते संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ असणे आवश्यक आहेत.
राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि क्रीडा स्पर्धांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने गुण दिले जातात. त्याप्रमाणे महोत्सवातील विजेत्यांना गुण देण्याची व्यवस्था विद्यापीठाने करावी. महोत्सवातील तयारीसाठी खर्चाकरिता निधीची रक्कम वाढविणे आवश्यक आहे. या महोत्सवातून नाट्य, चित्रपटसृष्टीला अनेक चांगले अभिनेते, गायक, वादक, आदी कलाकार मिळाले आहेत. ते लक्षात घेऊन विद्यापीठाने बदल स्वीकारणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
परिपत्रकानंतर अनेक महाविद्यालयांना जागविद्यापीठाने युवा महोत्सवाबाबतचे परिपत्रक पाठविल्यानंतर काही महाविद्यालयांतील सांस्कृतिक विभागाला जाग येते. ते टाळण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविणे, या विभागांसाठी विद्यापीठाने बंधनकारक करणे आवश्यक आहे.
आॅगस्टमध्येच महोत्सव व्हावेतराज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी विद्यापीठांचे मध्यवर्ती युवा महोत्सव आॅगस्ट ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होतात; त्यामुळे त्यांना ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय महोत्सवासाठी तयारी करायला जादा दिवस मिळतात. त्याच पद्धतीने शिवाजी विद्यापीठाने आॅगस्टमध्येच जिल्हास्तरीय आणि मध्यवर्ती महोत्सव घेण्याचे नियोजन अधिक चांगले ठरणार आहे.
तज्ज्ञ परीक्षक असावेतमहोत्सवातील विविध स्पर्धांसाठी परीक्षकांची नियुक्ती करताना ते संबंधित कलाप्रकारांतील तज्ज्ञ असावेत. महोत्सवात सहभागी असलेल्या महाविद्यालयांशी ते संबंधित असता कामा नयेत. परीक्षकांनी दिलेला निर्णय हा अंतिम मानने आवश्यक असल्याचे चित्रकार-छायाचित्रकार विजय टिपुगडे यांनी सांगितले. ते म्हणाले, महोत्सवासाठी विद्यार्थी कलाकार वर्षभर तयारी करतात; त्यामुळे मध्यवर्ती महोत्सवात सहभागी होणाऱ्या आणि विजेता ठरणाऱ्या विद्यार्थी कलाकारांना एनएसएसप्रमाणे ठरावीक गुण देण्याची तरतूद विद्यापीठाने करावी.