कोल्हापूर : शेतीपंपाचे वीजबिल दुरूस्त न करता वसुलीचा तगादा लावल्यास ‘महावितरण’चे कार्यालय बंद पाडून टाळे लावू, असा इशारा मंगळवारी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय पाटील यांनी ‘महावितरण’चे कोल्हापूर परिमंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता एस. बी. मारूळकर यांना निवेदनाद्वारे दिला. त्याचबरोबर त्रयस्थ यंत्रणेमार्फत शेतीपंपाची पटपडताळणी करून सत्य उजेडात आणावे, अशी मागणीही करण्यात आली.सकाळी साडेअकराच्या सुमारास ताराबाई पार्क येथील ‘महावितरण’च्या कार्यालयात संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एस. बी. मारूळकर यांची भेट घेऊन शेतीपंपांबाबतच्या चुकीच्या धोरणांबाबत जाब विचारला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, वीज गळती कमी केली हे दाखविण्यासाठी शेतीपंपाचा वीज वापर वाढवून दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. आय.आय.टी. मुंबईने केलेल्या पाहणी अहवालानुसार शेतीपंपांचा वीज वापर १०६४ तास वर्षापोटी निश्चित केला आहे; परंतु ‘महावितरण’ने तो वाढवून १९०० ते २००० तास दाखविला आहे. त्यामुळे वापर निम्मा असूनही दुप्पट दाखविला गेला आहे. मीटर नसलेल्या शेतीपंप ग्राहकांचा जोडभार वाढविण्यात आला आहे.
मीटर रिडिंग न घेता दरमहा प्रतिहॉर्सपॉवर १२५ युनिटस्प्रमाणे बिलिंग करण्यात आले आहे. दि. १३ जुलै २०१७ ला ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांची वीज बिले दुरूस्त करून बिलिंग सुरू करू, असे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप कार्यवाही शून्य झाली आहे.
प्रत्यक्ष जागेवर तपासणी करून मार्च २०१७ अखेरचे बिल दुरूस्त व अचूक करून मिळाले तसेच एप्रिल २०१६ पासूनची सर्व बिले दुरूस्त करून मिळावीत तसेच त्रयस्थ यंत्रणेमार्फत शेतीपंपांची पटपडताळणी करून त्याचे सत्य उजेडात आणावे तसेच शेतीपंपाची विज बिले अचूक व दुरूस्त न करता वीज तोडणे, वसुलीसाठी तगादा लावणे अशा बाबी समोर आल्यास ‘महावितरण’च्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल. यावेळी रोहन रेडेकर, योगेश हत्तलगे, प्रथमेश तेली, तानाजी मोरे, योगेश कांबळे, सौरभ परळीकर, राज पुजारी, दत्तू भोसले आदी उपस्थित होते.