कोल्हापूर : आपल्या घरात पाणीपुरवठा होत नाही, अशी सातत्याने तक्रार करणाऱ्या एका नागरिकाने तुमच्या विरोधात तक्रार करण्याचा इशारा देताच संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याने उलट तक्रारदारालाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना, ते काय पाणी सोडायला येणार आहेत का’ अशा शब्दांत सुनावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. तक्रारदार पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोरच हा घडलेला प्रकार ऐकवला तेव्हा खवळलेल्या आयुक्तांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना चांगलेच सुनावले. जर १८ नोव्हेंबरपर्यंत तक्रारीचे निराकरण झाले नाही तर त्यानंतर रोज एक हजार रुपये दंड केला जाईल, असा सज्जड दम आयुक्तांनी दिला. अचानक समोर आलेल्या या प्रकाराने अधिकाऱ्यांची एकच भंबेरी उडाली.शनिवार पेठेत भाऊसिंगजी रस्त्यावर राहणाऱ्या मनोज रामचंद्र पाटील यांच्या घरात गेल्या दोन वर्षांपासून काही तांत्रिक कारणाने पाणीपुरवठा होत नव्हता. जेमतेम तासभर आणि तेही कमी दाबाने पाणी मिळत होते. त्यामुळे पाटील यांनी संबंधित शाखा अभियंता, अन्य कर्मचाऱ्यांच्याकडे तक्रार करत होते; परंतु त्यांच्या तक्रारीची कोणीच दखल घेत नव्हते.
एके दिवशी संतापाने त्यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्याचा इशारा त्या अधिकाऱ्यांना दिला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेण्याऐवजी उलट पाटील यांनाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरांना सांगा, ते काय पाणी सोडायला येणार आहेत का?’ अशा उर्मट भाषेत पाटील यांचा अवमान केला होता. काही दिवसांपूर्वीचा हा किस्सा आहे.पाटील सोमवारी लोकशाही दिनात आले होते. त्यांनी अधिकाऱ्यांच्यासमोर आयुक्त अभिजित चौधरी यांना हा प्रकार ऐकवला. अचानक चर्चा उपस्थित झाल्यामुळे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. आयुक्तांचाही रागाचा पार चढला. त्यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना धारेवर धरले. ‘तुमच्याबद्दलच्या असल्या तक्रारी ऐकायला मी येथे बसलो आहे का’ अशी विचारणा करत जर १८ नोव्हेंबरपर्यंत तक्रारीचे निरसन झाले नाही तर रोज एक हजार रुपये दंड केला जाईल, अशा शब्दांत दम भरला.महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा उर्मटपणा, त्यांच्या कामाची पद्धत, बेजबाबदारपणाचा एक अस्सल नमुना पाहायला मिळाल्याने आयुक्त चौधरी यांनी तीव्र शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. आपापल्या कार्यकक्षेतील कामे तातडीने पूर्ण करा, लोकशाही दिनापर्यंत तक्रारीही येता कामा नयेत, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांवर राग व्यक्त केला. सोमवारच्या लोकशाही दिनात एकूण १३ तक्रारी दाखल झाल्या होत्या.