कोल्हापूर : यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच पोलिसांना चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे. शासनाच्या आदेशानुसार आवाजाची पातळी मोजण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणी साउंड सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केल्यास दखलपात्र आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.गणेशोत्सव उत्साही वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी खूप मेहनत घेतली आहे. रविवारची सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक ही आमच्यासाठी फायनल परीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही गर्दी, वाहतूक, सुरक्षा या मुद्द्यांवर बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
गणेश मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक व आर्थिक संस्था यांचे प्रबोधन करून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी एकूण १११२ सार्वजनिक व महत्त्वाच्या ठिकाणी १६७९४ सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. गणेशोत्सव काळात सुमारे १८ हजार २७४ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.कुठेही वाद नाही. ज्या-ज्या ठिकाणी वाद होण्याची परिस्थिती होती, त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने वाद शमविण्यात आले आहेत. मोठ्या सिस्टीम आता कमी प्रमाणात दिसत आहेत. मिक्सर मागण्याची मंडळांची विनंती आहे. यातून मोठा आवाज होतो. त्याचे परिणाम सांगितल्याने त्यांनी मागणी मागे घेतली.
साधारणत: स्पीकर, कर्णे आणि पारंपरिक वाद्यांत मिरवणुका काढण्याचे आवाहन मंडळांना आम्ही केले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाचही जिल्ह्यांमध्ये मिरवणूक शांततेत पार पडेल, असे वातावरण सध्या असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.साताऱ्यामध्येही गुन्हे दाखल होतीलकोणीही काहीही म्हटले तरी गणेश विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीम वाजणार नाही. तरीदेखील कोणी ती वाजविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘साउंड सिस्टीम लावणारच, कोण अडवतो ते बघतो,’ असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे साताऱ्यात साउंड सिस्टीम वाजणार काय? असा प्रश्न पत्रकारांनी नांगरे-पाटील यांना विचारला, त्यावर ते म्हणाले, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साउंड सिस्टीमला बंदी घालण्यात आली आहे.
तसेच कोल्हापूर परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी साउंड सिस्टीम स्वत:च्याच ताब्यात घेऊन सीलबंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे साउंड सिस्टीम लावण्यासाठी बाहेर काढल्यास पोलीस तत्काळ कारवाई करून ती जप्त करित आहेत. साताऱ्यामध्ये यापूर्वी असे गुन्हे दाखल केले आहेत. यंदाही कायद्याचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल केले जातील, असे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.परिक्षेत्रातील पोलीस बंदोबस्त
- पोलीस अधीक्षक- ५
- अप्पर पोलीस अधीक्षक- ७
- पोलीस उपअधीक्षक- ३५
- पोलीस निरीक्षक- १२२
- पोलीस उपनिरीक्षक- ४६५
- कॉन्स्टेबल- ८९१७
- होमगार्ड- ३३३२ (पुरुष), ७७१ (महिला)
- एसआरपी कंपनी- ४
- दंगल काबू पथक- २
- विशेष पोलीस अधिकारी- २२८९
बेकायदेशीर हत्यारे जप्तकोल्हापूर परिक्षेत्रात २४५ बेकायदेशीर शस्त्रे जप्त केली आहेत. त्यांपैकी रिव्हॉल्व्हर २२, पिस्टल १४०, बंदूक १७, गावठी कट्टे ६६, काडतुसे ३८२, मॅग्झिन ३ अशी अग्निशस्त्रे जप्त केली आहेत.