कोल्हापूर : जिल्ह्यातील लोककलाकारांना महिन्याला मिळणारे १५०० रुपये मानधन गेल्या २१ महिन्यांपासून थकीत आहे. ते २० मेपर्यंत कलाकारांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. या कालावधीत हे मानधन न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघातर्फे सोमवारी (दि. ७) येथे देण्यात आला.खिंडी-व्हरवडे (ता. राधानगरी) येथे लोककलाकार संघातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष विलासराव पाटील होते.जिल्ह्यातील ४८७ वयोवृद्ध मानधनधारक कलाकारांचे मानधन गेल्या २१ महिन्यांपासून थकीत आहे. याबद्दल लोकलाकार संघाने वेळोवेळी आवाज उठवून पाठपुरावा केला आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली आहेत. तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावाही केला आहे.
याची दखल घेऊन कलाकारांचे थकीत मानधन कोणत्याही परिस्थितीत २० मेपर्यंत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती बैठकीत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे कलाकारांनी संयम बाळगावा; उपोषणाचा निर्णय घेऊ नये, असे सांगण्यात आले. दिलेल्या वेळेत शासनाने मानधन न दिल्यास नक्कीच तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.यावेळी संघाचे सदस्य भगवान पाटील, डॉ. बाजीराव खांडेकर, राधानगरी तालुकाध्यक्ष पांडुरंग आवळकर, सज्जन पाटील, दिनकर चौगले, अनिता मगदूम, बाजीराव तराळ, आदी उपस्थित होते.
लोककलाकारांचे थकीत मानधन २० मेपर्यंत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे त्यापूर्वी कोणीही उपोषणासह कोणतेही आंदोलन करू नये. जर सरकारने दिलेला ‘शब्द’ पाळला नाही, तर २० मेनंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल.- दिनकर चौगले,कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघ