कोल्हापूर : शहरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे डिझाईन करताना हा पुतळा आणि त्याचा चबुतरा हलवून येथील धगधगता इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी आठवड्यात खुलासा करावा; अन्यथा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा समस्त कोल्हापूरवासीयछत्रपती शिवाजी महाराज भक्तांच्या वतीने निवासराव साळोखे यांनी दिला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून वर्षभर सुशोभीकरण सुरू आहे. या पुतळा आणि चबुतऱ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. आमचा सुशोभीकरणाला विरोध नाही, पण पुतळा व चबुतरा हलविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.
त्याबाबत नोव्हेंबरमध्ये संघटनांच्या वतीने आयुक्तांकडे लेखी प्रश्न उपस्थित केले; पण संबंधित अभियंता एस. के. माने यांनी उत्तरदाखल दिलेले पत्र व नकाशावरून पुतळा हलविणे, त्याच्या मूळ रूपात बदल करणार असल्याचे दिसते. त्याबाबत आयुक्तांनी आठवड्यात खुलासा करावा; अन्यथा शहराच्या चौका-चौकांत, पेठा-पेठांत जनजागृती मोहीम हाती घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा साळोखे यांनी दिला.
बैठकीतही रस्त्यावर उतरण्याचा इशारामिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीतही, निवासराव साळोखे, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, संभाजीराव जगदाळे, अशोक पोवार, बंडा साळोखे, अॅड. बाबा इंदुलकर, आदींनी मनोगत व्यक्त करताना पुतळा व चबुतरा हलवून इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला तर सहन केला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी राजाराम पाटोळे, स्वप्निल पार्टे, श्रीकांत भोसले, नगरसेवक अजित ठाणेकर, मदन चोडणकर, रमेश मोरे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुतळ्याचा इतिहाससन १९२९ पासून येथे ब्रिटिश गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांचा पुतळा होता; पण स्वातंत्र्यदामिनी भागीरथीबाई तांबट, जयाबाई हविरे यांनी १९४२ मध्ये दुपारी अॅसिडमिश्रित डांबराची मडकी पुतळ्यावर भिरकावून तो पुतळा विद्रूप केला. त्यानंतर पहाटे दत्तोबा तांबट, शंकरराव माने, निवृत्ती आडुरकर, सिदलिंग हविरे, शामराव पाटील, आदींनी विल्सन पुतळ्याची तोडफोड केली. त्या जागी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी शिल्पकार बाबूराव पेंटर यांच्याकडून केवळ १८ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा तयार करून तो १४ मे १९४५ रोजी त्याच चबुतऱ्यावर दिमाखात उभा केला.