कोल्हापूर : पैशांअभावी कोणाचे शिक्षण किंवा उपचार राहणार असतील, तर त्यांच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही देत पुढील १0 वर्षे ही सेवा केली जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.ते अकबर मोहल्ला येथील कोल्हापूर महापालिका सामाजिक सभागृह इमारतीच्या उद्घाटन समारंभप्रसंगी सायंकाळी बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, नगरसेवक ईश्वर परमार, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, रियाज सुभेदार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिका व त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचे जे उमेद्वार निवडून येतील, त्या प्रत्येकाशी मी विकासकामांबाबत चर्चा केली. त्यानंतर नगरसेविका सुभेदार यांनी मला मुस्लिम समाजातील महिलांना रोजगार व प्रशिक्षण मिळावे, असे फोनवरून सांगितले.
त्यावर मी ‘तुम्ही सर्व महिलांना एका सभागृहात आणा’असे सुभेदार यांना सांगितले. त्यांनी अकबर मोहल्ला येथे सभागृह आहे; पण ते खराब आहे, असे सांगितल्यावर माझ्या विशेष निधीतून सभागृहाची डागडुजी करून देतो,असे आश्वासन त्यांना दिले. स्वत: अकबर मोहल्ला येथे भेट दिली आणि येथील महिला, मुलींशी चर्चा केली. या समाजातील मुली उच्चशिक्षित आहेत, असे समजले. त्यामुळे मी मदत करण्याचे ठरविले.
शालेय विद्यार्थिनींना साहित्य दिले. याचबरोबर या समाजातील महिलांचे आरोग्य सदृढ राहावे; यासाठी एक स्वतंत्र महिला डॉक्टर देण्याचे नियोजन आहे. ही महिला डॉक्टर तपासणीबरोबर औषधे, गोळ्या देईल. हे माझे कार्य पुढील १0 वर्षे सुरू ठेवणार आहे. यावेळी हमजेखान शिंदी यांच्यासह अकबर मोहल्ला कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.