कोल्हापूर : कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प गेले १0 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहे, यामध्ये शहरातून येणारा सर्वच कचरा थेट या वीज प्रकल्पावर नेऊन, तेथे वीज निर्मिती सुरू आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पास नुकतीच भेट देऊन पाहणी केली असली, तरी तांत्रिक बाबी तपासणीसाठी उद्या, शनिवारी मुंबईच्या आयआयटीचे पथक कोल्हापुरात दाखल होत आहे. या पथकामार्फत प्रकल्पाच्या अद्ययावत मशिनरीची तपासणीही होणार आहे. या प्रकल्पासाठी रोज किमान १५० ते १७५ टन कचरा पुरविला जात आहे.कसबा बावडा येथील झूम कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी सध्या साडेपाच लाख टन कचरा पडून आहे. त्याचे कॅपिंग करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे; पण शहरात रोज नव्याने तयार होणाऱ्या कचऱ्यांवर प्रक्रिया करून वीजनिर्मितीसाठी ग्रीन एनर्जी या कंपनीमार्फत ‘बांधा, वापरा, हस्तांतर करा’ हा सुमारे १५ कोटी रुपये खर्चून प्रकल्प उभारला आहे. महापालिकेने रोज किमान २०० टन घरगुती कचरा पुरविल्यास त्यातील ३० टन किचन वेस्ट, ओल्या कचऱ्यामधून किमान २०० किलोवॅट वीजनिर्मिती होणार आहे. उर्वरित कचºयातून ४० टन दगड-माती, ८० ते १०० टन आरडीएफ मिळत आहे.हा प्रकल्प गेले दोन महिने सुरू असला, तरी गेल्या महिनाभरात या प्रकल्पाचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले. त्यातून दि. १ जानेवारीपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला; पण प्रारंभीच्या काळात सुमारे २०० टन कचरा मिळाला; पण आता रोज १५० ते १७५ इतका कचरा मिळतो; त्यामुळे शहरातून जमा होणारा सर्वच कचरा येथे आणून त्यावर प्रक्रिया केली जात आहे.
आठवड्यात महापालिकेचे उपायुक्त मंगेश शिंदे, प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी भेटी देऊन विविध सूचना केल्या आहेत. दरम्यान, या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी तपासण्यासाठी मुंबई आयआयटीचे पथक उद्या, शनिवारी कोल्हापुरात येत आहे.
किचन वेस्टमध्ये प्लास्टिकचे प्रमाणवीजनिर्मितीसाठी प्रामुख्याने किचन वेस्ट हा हॉटेल, मटन मार्केट यांच्यासह ओला कचऱ्याची आवश्यकता असते; पण हॉटेलमधून येणाऱ्या कचऱ्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक चमचे, प्लास्टिक बाटल्या येत असल्यामुळे ते स्वतंत्र करताना अडचणी निर्माण होत आहेत; त्यामुळे हॉटेलमधून येणारा कचरा प्लास्टिक व ओला कचरा असा स्वतंत्र करण्याच्या सूचना प्रत्येक हॉटेलला महापालिकेने दिल्या आहेत.