कोल्हापूर : सामाजिक व धार्मिक ऐक्याची परंपरा लाभलेल्या दिलबहार तालमीमध्ये गेल्या तीन दशकांहून अधिक काळ साईबाबांची मूर्ती आहे. त्या जागी लवकरच नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
आझाद चौकातील या तालमीला सामाजिक व धार्मिक ऐक्याची परंपरा आहे. यासह फुटबॉलसारख्या खेळातही या तालमीचा दबदबा आहे. या तालमीमध्ये गेल्या तीन दशकांहून अधिक काळ माजी महापौर रामभाऊ फाळके यांच्या नेतृत्वाखाली साई मंदिराची स्थापना करण्यात आली. त्यानुसार साईबाबांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
या जुन्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती बसविण्याचा मानस भक्तांनी जाहीर केला होता. त्यानुसार जयपूर येथे नवीन मूर्ती विशेष कारागीरांकडून बनविण्यात आली. घडविलेल्या या नवीन मूर्तीवर शिर्डी येथे नुकतेच धार्मिक विधी झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते माजी महापौर रामभाऊ फाळके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी तालमीचे अध्यक्ष विनायक फाळके, संजय डमकले, महेश भिसे, अजित पाटील, संजय रायकर, प्रदीप साळोखे, अण्णा बराले, अमित भोसले, गुलाबराव सरनोबत, प्रशांत गवळी, राजेंद्र माने, आदी उपस्थित होते. ही मूर्ती कोल्हापुरात दाखल झाली असून, येत्या काही दिवसांत विधीवत सोहळ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.