कोल्हापूर : ‘गोकुळ’च्याकोल्हापूर शहरातील दूध वितरकांनी दूध विक्री बंद केल्याने कळंबा, नागाव व शिरोली पुलाची येथे काहीसा परिणाम जाणवला, पण शहरासह उपनगरात ‘गोकुळ’ने वीस ठिकाणी दूध विक्रीचे टेम्पो ठेवल्याने दूध वितरण सुरळीत झाले. रोज शहरासह उपनगरात लाख लिटर दूध विक्री होते. सोमवारी ८१ हजार लिटर दुधाची विक्री झाली.‘अमूल’, ‘शाहू’ दूध संघांप्रमाणे ‘गोकुळ’ने दूध विक्री कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी शहरातील विक्रेत्यांनी केली होती. त्यासाठी सोमवारी दूध विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता, पण ‘गोकुळ’ने ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून दूध विक्रीची यंत्रणा उभी केली होती.
सकाळी सहापासून वीस ठिकाणी दुधाचे टेम्पो दूध विक्रीसाठी उभे केले होते. लहान ३४ विक्रेते व टेम्पोच्या माध्यमातून दिवसभरात ८१ हजार लिटरची विक्री झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली नाही. कळंबा, नागाव व शिरोली पुलाची येथे दूध विक्रीवर थोडा परिणाम झाला. सुमारे १० ते १२ हजार लिटर दूध वितरित होऊ शकले नाही.दरम्यान, आज, मंगळवारच्या दुधासाठी ३६१ विक्रेत्यांनी १ लाख ५ हजार लिटरचे सुमारे ५१ लाख रुपये सोमवारी बॅँकांच्या माध्यमातून ‘गोकुळ’कडे जमा केले.लहान विक्रेत्यांची चंगळमोठे विक्रेते ‘गोकुळ’कडून दूध घेऊन ते शहर व उपनगरातील लहान-लहान विक्रेत्यांना देतात. त्यांना एक रुपये कमिशन दिले जाते, पण सोमवारी संघाने या लहान विक्रेत्यांकडेच दूध पोहोच केले. त्यांची विक्री वाढलीच, पण त्यांना विक्रीपोटी थेट १ रुपये ९० पैसे कमिशन मिळाल्याने त्यांची चांगलीच चंगळ झाली.