कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरू केलेल्या संपाचा परिणाम दिसू लागला आहे.
कोल्हापुरात आंदोलनाची तीव्रता नसली तरी नाशिकसह इतर भागातून येणाऱ्या मालावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शनिवारी आठशे क्विंटलने कांद्याची आवक कमी झाली आहे.शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव द्या, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १ जून २०१७ रोजी शेतकरी संप केला होता. त्याला वर्ष झाले तरी अद्याप मागण्या तशाच असल्याने किसान सभेने शुक्रवार (दि. १)पासून पुन्हा आंदोलन हाती घेतले आहे.कोल्हापुरात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शनिवारी मात्र सभेच्या वतीने आंदोलनाचा कोणताही कार्यक्रम हाती घेतला नाही. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथे ऊसदराचा प्रश्न, दूधदराचा प्रश्न एवढा ताणला नसल्याने आंदोलन आक्रमक नाही; पण नाशिकसह इतर भागातून येणाºया शेतीमालावर त्याचा परिणाम झालेला दिसतो.
कांद्याची आवक घटली असून, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ८०० क्विंटलने बाजार समितीत कांदा कमी आला आहे. भाजीपाल्यासह इतर शेतीमालावर त्याचा परिणाम झालेला दिसत नाही.