कोल्हापूर : पंकचर काढून कार रस्त्यावरून बाजूला घेताना अचानक चालकाचा ब्रेक ऐवजी एक्सलरवर पाय पडल्याने समोरच्या दोन चार वाहनांना धडक दिली. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने गोंधळ उडून, या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. या अपघातात मात्र कोणी जखमी झाले नाही.अधिक माहिती अशी, महावीर कॉलेज चौकात मज्जमील शब्बीर चौधरी (वय ३०, रा. रमनमळा) याचे पंक्चरचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आशुतोष पोवार यांनी आपली कार (एम. एच. ०९ डी. एम. ९४४७ ) ही पंक्चर झाल्याने ती चौधरी यांच्या दुकानासमोर रस्त्यावर पार्किंग करून पंक्चर काढण्यास सांगून ते रिक्षाने घरी निघून गेले.दरम्यान चौधरी याने पंक्चर काढल्यानंतर कार रस्त्यावरून बाजूला घेत असताना त्याचा पाय ब्रेकऐवजी एॅक्सीलेटरवर पडल्याने कारची गती वाढून तीने समोरच्या दोन दुचाकींना धडक देत एका रिक्षासह कारला धडक देऊन रस्त्याच्या विरोधी दिशेच्या फुटपाथवर चढली.
या अपघातात अपघातग्रस्त कारमालक आशुतोष पोवार, रिक्षाचालक अमित घोरपडे, राजेंद्र पाटील यांच्या चारीही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक कारचालक वाहनांना धडक देत गेल्याने गोंधळ उडाला.
नागरिकांची गर्दी झाल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. चालक चौधरी या प्रकाराने भांबावून गेला. त्याला काहीच सुचेनासे झाले. त्याचे दुकान चौकात असल्याने, तो ओळखीचा असल्याने, परिसरातील नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेतली. या प्रकाराची माहिती मिळताच शाहूपुरीचे पोलीस नाईक मानसिंग सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातामध्ये कोणी जखमी झाले नाही.