कोल्हापूर : पुणे-बंगलोर महामार्गावर शिरोली येथील सरकारी रुग्णालयासमोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीची दुचाकीला धडक बसून खासगी रुग्णालयात काम करणारी परिचारिका जागीच ठार झाली. सारिका वसंत कांबळे (वय २३, रा. लाईन बझार, कसबा बावडा) असे तिचे नाव आहे. तिचा मित्र अक्षय शशिकांत बुचडे (२५, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा) किरकोळ जखमी झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला.अधिक माहिती अशी, सारिका कांबळे ही कसबा बावडा परिसरातील खासगी रुग्णालयात परिचारिका होती. याच रुग्णालयात अक्षय बुचडे हा नोकरी करीत होता. त्यामुळे दोघांची मैत्री होती. बुचडे हा सध्या कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे. मंगळवारी साप्ताहिक सुटी असल्याने दोघेजण पेठवडगाव येथील मैत्रिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले.
शिरोली येथील सरकारी रुग्णालयासमोर येताच उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा धक्का लागून दोघेजण रस्त्यावर पडले. डोक्याला गंभीर दुखापत होऊन सारिकाचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यांसमोर मैत्रिणीचा मृत्यू झाल्याचे पाहून अक्षय भांबावून गेला. त्याला काय करावे ते समजत नव्हते.
आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला सावरत रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात पाठविले. अक्षयच्या उजव्या हाताला किरकोळ जखम झाली होती. अपघात विभागात निपचित पडलेली सारिका पाहून तिच्या आई व बहिणींनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तिच्या पश्चात आई, तीन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. तिच्या वडिलांचे सतरा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. अपघाताबाबत शिरोली एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ताईला शेवटचा फोनप्रतिभा कांबळे ह्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल आहेत. त्या सोमवारी (दि. १२) कर्तव्यावर असताना दुपारी दोनच्या सुमारास त्यांना बहिण सारिकाचा फोन आला. ‘ताई, मी वडगावला जाऊन येते,’ असा तिने निरोप दिला. यावेळी प्रतिभा यांनी ‘जेवण करून सावकाश जा,’ असे तिला सांगितले.
त्यानंतर तासाभरात बहिणीच्या अपघाती मृत्यूची बातमी कानांवर आली. हा धक्का प्रतिभा यांना सहन झाला नाही. त्या पोलीस ठाण्यातच कोसळल्या. इतर सहकाऱ्यांनी त्यांना सावरले. सीपीआर रुग्णालयात त्यांच्या सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती.