कोल्हापूर : हॉटेल्स, बार आणि परमिटरूममधील गुंडगिरी आणि गुन्हेगारी घटना वाढल्या असून याला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत अशी मागणी कोल्हापूरहॉटेल मालक संघाने पोलिस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.संघाचे अध्यक्ष उजजवल नागेशकर, परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष उदयसिंह निंबाळकर, चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष सचिन शानभाग,सरचिटणीस सिध्दार्थ लाटकर, खजानिस मोहन पाटील, सहसचिव आशिष रायबागे, आॅडिटर शंकरराव यमगेकर, जनसंपर्क प्रमुख अरूण चोपदार यांनी अमृतकर यांची भेट घेऊन या मागण्यांबाबत चर्चा केली.हॉटेल्स, परमीटरूम आणि बारमध्ये किरकोळ कारणावरून वादविवाद, भांडणतंटे, शिवीगाळ करणे, दरडावणे, धमकावणे, धाक, दहशत दाखवणे असे प्रकार वाढले आहेत. याहीपुढे जावून व्यवसाय, मालमत्तेचे नुकसान करणे, हॉटेल मालक, व्यवस्थापक, कर्मचारी यांना मारहाण करणे यासारखे प्रकारही वाढले आहेत. या सर्व प्रकारांमध्ये हॉटेल व्यावसायिकांकडे ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून पाहिले जाते.तेव्हा पोलीस दलाने याबाबतीत कठोर पावले उचलून या वाढत्या प्रकारांना आळा घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासन आणि प्रशासनाला नेहमीच हॉटेल व्यावसायिकांचे सहकार्य असते. तेव्हा हॉटेल व्यावसायिक, परमीट रूम आणि बारमध्ये या वाढत्या गुंडगिरीला तातडीने रोखावे अशी मागणी करण्यात आली.