कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सव आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत ५० लाखांची भर पडली आहे. केवळ दोन महिन्यांत अभिषेकासह अन्य धार्मिक विधी, दानपेट्या, सोने-चांदी, अन्नछत्र अशा विविध माध्यमांतून मंदिराच्या तिजोरीत दोन कोटी रुपये जमा झाले आहेत.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख देवता असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वर्षागणिक वाढ होत आहे. यंदा शारदीय नवरात्रौत्सव आणि १५ दिवसांनी आलेल्या दिवाळीच्या सुट्टीमुळे मंदिराच्या उत्पन्नात यंदा ५० लाखांचे जास्त दान मिळाले आहे. यात ३२ लाखांचा सोन्याचा किरीट, यामध्ये ३८ लाख रुपयांच्या देणग्या, ९३ लाखांची रोकड तसेच ३३ लाखांच्या सोने-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. गतवर्षी देवीला याच काळात दीड कोटीचे दान मिळाले होते.देवीचा अभिषेक, सेवा, शाश्वत पूजा, महाप्रसाद देणगी या धार्मिक विधींतून यंदाच्या नवरात्रौत्सवाच्या काळात देवस्थान समितीकडे ३८ लाख रुपये जमा झाले आहेत. देवस्थानचे उत्पन्न वाढावे यासाठी समितीच्या वतीने मंदिराच्या परिसरात ठिकठिकाणी दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मंदिराच्या आवारातील १२ पेट्यांमधून ९३ लाख रुपये मंदिराच्या तिजोरीत आले आहेत. ही रक्कम गतवर्षी जमा झालेल्या रोकडीच्या तुलनेत जास्त आहे.यशिवाय अंबाबाईला अनेक भाविक सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करीत असतात. दानपेट्यांमधून एक लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जमा झाले आहेत. त्यामध्ये २० ग्रॅम सोने, ६१० ग्रॅम सोने-चांदीचा समावेश आहे, तर कोलकाता येथील एका भक्ताने दीपावलीला देवीला ३२ लाखांचा सोन्याचा किरीट अर्पण केला होता. त्यामुळे या उत्सवकाळात देवीच्या सोने-चांदी खजिन्यामध्ये ३३ लाखांचे दान जमा झाले आहे. या व्यतिरिक्त रीतसर पावती करून अर्पण केलेल्या सोन्या-चांदी दागिन्यांची संख्या वेगळी आहे.
लाडू विक्रीच झाली ११ लाखांचीकेवळ नवरात्रौत्सवात मंदिराला अभिषेक,धार्मिक विधींतून ९ लाख ८० हजार, देणगीतून ८ लाख, अन्नदान देणगीतून ३ लाख, शाश्वत पूजेतून १८ हजार, लाडू विक्रीतून ११ लाख, साडी विक्रीतून २ लाख ८२ हजार, महाप्रसाद देणगीतून ९० हजार, अन्नछत्रासाठी ५ हजारांची देणगी मिळाली आहे.
अलीकडच्या काळात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे; त्यामुळे देवीला येणाऱ्या देणगीत व सोन्या-चांदीच्या अलंकारातही वाढ झाली आहे. दुसरीकडे समितीनेही खंडाच्या रूपात येणाऱ्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित केले आहे. आता येणाऱ्या भाविकांना त्या पद्धतीने सेवा देण्याचा देवस्थान समितीचा प्रयत्न राहील.महेश जाधव, अध्यक्ष,प. म. देवस्थान व्यवस्थापन समिती
लाईव्ह दर्शनाचा २ कोटी भाविकांना लाभएक वर्षापूर्वी देवस्थान समितीने श्री अंबाबाईच्या लाईव्ह दर्शनाला सुरुवात केली. या सुविधेमुळे जगभरातील भाविक काही क्षणात अंबाबाईचे दर्शन घेत आहेत. गेल्या वर्षभरात विविध देशांतील जवळपास २ कोटी भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.