कोल्हापूर : विष प्राशन केलेल्या इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सुनील शामराव पाटील (वय ४२, रा. जवाहरनगर चौक) यांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी रुग्णालयास भेट देऊन डॉक्टरांकडे त्यांच्या प्रकृतीसंबधी चौकशी केली. दरम्यान, पाटील याने दोन महिला पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा पोलीस दलात आहे. संबंधित महिला पोलीस आजारी रजेवर गेल्या आहेत. त्यांच्याकडे याप्रकरणी गोपनीय चौकशी सुरू असल्याचे समजते.
सुनील पाटील हे दोन वर्षांपूर्वी गांधीनगर पोलीस ठाण्यात हजेरी मास्तर म्हणून नोकरीवर असताना त्यांची येथील दोन महिला कॉन्स्टेबलशी मैत्री होती. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या प्रेमाच्या त्रिकोनात सुनील गुंतून गेले होते. त्यातून या महिला पोलीस त्यांना ब्लॅकमेल करीत होत्या. हा प्रकार घरी समजल्यानंतर पत्नीही माहेरी निघून गेली होती.
कौटुंबिक कलह आणि महिला पोलिसांकडून होणारे ब्लॅकमेलिंग या त्रासातून त्यांनी विष प्राशन केल्याची चर्चा पोलीस दलात आहे. शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते बेशुद्ध असलेने त्यांचा जबाब अद्याप घेता आलेला नाही. पोलिसांनी वादग्रस्त दोन महिला पोलिसांची चौकशी सुरू केली आहे.
अद्याप याप्रकरणी कोणाविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. बुधवारी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी रुग्णालयास भेट देऊन पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांच्या जिविताला कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी मुंबईहून तज्ज्ञ डॉक्टर बोलविता येतात का, यासंबंधी येथील डॉक्टरांशी त्यांनी चर्चा केली. या प्रकरणाने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.