कोल्हापूर : नवरात्रौत्सवानिमित्त करवीर निवासीनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे. याकरीता जिल्हा पोलीस प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे विविध उपाययोजना, नियोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंदीर व परिसराची पाहणी केली.अवघ्या पाच दिवसांवर येवून ठेपलेल्या नवरात्रौत्सवात देवीच्या दर्शनासाठी दहा दिवसांमध्ये राज्यासह देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी दोन लाखाहून अधिक भाविक पहाटे देवीचे दार उघडल्यापासून ते बंद होईपर्यंत दर्शन घेतात. यानिमित्त होणारी मंदीर व परिसरात होणारी गर्दी लक्षात घेवून जिल्हा पोलीस प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती विविध उपाय योजना व नियोजन करीत आहे.
याची पाहणी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी शुक्रवारी मंदीर व परिसरातील चारही दरवाजे आणि गरुड मंडपात ठेवण्यात आलेली सुवर्ण पालखी यांची पाहणी करीत सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसंबधी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी चर्चा करीत मंदीर व्यवस्थापनाच्या ६० सुरक्षारक्षकांशीही चर्चा करीत आढावा घेतला.
यावेळी त्यांच्यासोबत शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, विशेष वार्ता शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे, देवस्थानचे सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, सदस्या संगीता खाडे,सदस्य शिवाजीराव जाधव, मंदीर व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी उपस्थित होते.