कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) दिव्यांग प्रवर्गातील २५ कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाकडून या महिन्याभरात केली जाईल, असे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिले.सोमवारी पतित पावन संघटनेच्या शिष्टमंडळाने डॉ. रामानंद यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी, सीपीआरमधील दिव्यांग कर्मचारीप्रश्नी २५ जानेवारीला निवेदन दिले होते. यावर पुढे काय झाले ?, काय कारवाई केली, अशी विचारणा रामानंद यांच्याकडे केली.
त्यावर रामानंद यांनी, दिव्यांग कर्मचारीप्रकरणी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल सादर केला आहे. त्यांचा अहवालानुसार जे. जे. रुग्णालयाकडून संबंधित २५ कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी व दिव्यांग प्रमाणपत्र तपासले जाणार आहे. यासाठी महिनाभर कालावधी जाणार आहे.
जे. जे. च्या अहवालानंतर संबंधितांवर निश्चितच कारवाई करू, कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात सूरज निकम, सौरभ घाटगे, संभाजी साळुंखे, महेश उरसाल, राजेंद्र सूर्यवंशी, संकेत नाळे, विशाल पाटील, अमित पाटील, शरद माने, सुधाकर सुतार आदींचा सहभाग होता.