कोल्हापूर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी मंगळवारी कोल्हापूरची श्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गळतीची पाहणी करून डागडुजीच्या तसेच मंदिराच्या शिखरावरील भेगा भरून घेण्याच्या सूचना केल्या.
मंदिरात पाणी साचून राहू नये यासाठी परिसरातील गटारी, चेंबर्सच्या स्वच्छतेसाठीही महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. अंबाबाई मंदिरातील महाकाली मंदिरासमोर तसेच प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी गळती आहे.
जोराचा पाऊस झाला की देवस्थानच्या कार्यालयासमोर तळे साचते. बाह्य परिसरातूनही ठिकठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, अभियंता सुदेश देशपांडे यांनी मंदिराच्या परिसराची पाहणी केली.यावेळी त्यांनी शिखराच्या आजूबाजूस टेरेसवर पडलेल्या भेगा तत्काळ भरून घ्याव्यात, ओवऱ्यांवरील गळती बंद करावी, मंदिरामध्ये जमा होणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी परिसरातील गटारी, चेंबर तत्काळ स्वच्छ करून घ्यावीत व पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या.
बाह्य परिसरातही महापालिकेच्या हद्दीतील गटारी स्वच्छ करून घेण्याबाबत पत्रव्यवहार, मंदिरावर उगविलेली छोटी झुडपे काढणे, अनावश्यक वस्तू काढून टाकणे, संपूर्ण मंदिरामध्ये पावसामुळे कोठेही शेवाळ होऊन भाविक पडणार नाहीत किंवा कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या.
मातुलिंग मंदिरातील दगडी भिंतीवरील रंग काढून त्याचे मूळ स्वरूप खुलविणे, महाद्वार दरवाजावरील निसटलेले दगड तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने व्यवस्थित करण्याबाबतही सूचना केल्या.सचिवांचे दुर्लक्ष... समितीची नाराजीसुट्या आणि अधिक महिना यांमुळे गेले महिनाभर अंबाबाई मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. भाविकांच्या रांगाच्या रांगा भवानी मंडपापर्यंत जात असून अंतर्गत भागात गर्दीमुळे गुदमरल्यासारखे होते, एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सेवा देण्यासाठी समितीचे पदाधिकारी धडपडत असले तरी सचिवांनी मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. मंदिराचे व्यवस्थापन पाहण्याची पहिली जबाबदारी सचिवांची असताना ते फिरकलेही नाहीत, अशी नाराजी सदस्यांनी व्यक्त केली.