- संदीप आडनाईक कोल्हापूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सीमाभागातील नऊ जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज, शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराज्य समन्वय बैठकीत सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजभवनाचे प्रधान सचिव संतोषकुमार यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीचा आढावा घेतला. माध्यम प्रतिनिधींसह कोणत्याही राजकीय व्यक्तींना बैठकीत प्रवेश देण्यात येणार नाही.
सीमावाद वगळून विविध प्रशासकीय समस्यांची चर्चा करण्यासाठी रेसिडेन्सी क्लबमध्ये होणारी ही बैठक सकाळी ११ ते १ या वेळेत होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराला कारणीभूत असलेल्या अलमट्टी धरणाची पाणीपातळी, आजरा तालुक्यातील किटवडे प्रकल्प, गोवा राज्यातून अवैध पद्धतीने होणारी दारू वाहतूक, लम्पी रोग, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, सीमाभागातील विद्यार्थ्यांचे दाखले, कर्नाटकातून येणारे हत्ती, कोरोना काळातील अनुदान, गर्भलिंग निदान चाचणी अशा विविध समस्यांसंदर्भात कर्नाटकातील बेळगाव, विजयपुरा (विजापूर), कलबुर्गी (गुलबर्गा) आणि बिदर जिल्ह्यांसह कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूरचे जिल्हाधिकारी या बैठकीत चर्चा करणार आहेत.