कोल्हापूर : रद्दीपासून इथेनॉल निर्मिती, पाणी आणि तेल वेगळे करणारे यंत्र, महामार्गावरील वाहनांच्या वेगावर वीज निर्मिती, कलिंगडच्या बियांपासूनचा प्रथिनेयुक्त असे विविध स्वरूपातील संशोधन शिवाजी विद्यापीठामध्ये पाहायला मिळाले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मध्यवर्ती आविष्कार महोत्सवात आपले संशोधन सादर केले. हे संशोधन पाहण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गर्दी केली होती.
उद्घाटनानंतर प्रमुख उपस्थितांनी महोत्सवातील विविध संशोधन प्रकल्प पाहिले. या महोत्सवात न्यू कॉलेजमधील यश आंबोळे याने महामार्गावरील वाहनांच्या वेगावर वीज निर्मितीचे संशोधन सादर केले. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या सौरभ थोरात, नयन साजणे, सुदर्शन सुतार, शिवप्रसाद शिंत्रे यांनी थ्री डी प्रिंटर डेव्हलपमेंट फॉर वॅक्स पॅटर्नचा प्रकल्प मांडला.
सायबर इन्स्टिट्यूटमधील नम्रता विभूते हिने कलिंगडच्या बियांपासून बनविलेला प्रथिनेयुक्त केक सादर केला. कऱ्हाडच्या एसजेएम कॉलेजच्या रूचिता चव्हाण हिने पाण्यामध्ये मिसळलेले तेल वेगळे करणारे यंत्राचा प्रकल्प सादर केला. त्याच कॉलेजमधील ऋतुजा थोरात हिने रद्दीपासून इथेनॉल निर्मितीचे संशोधन मांडले.
दरम्यान, या महोत्सवात मानव्यशास्त्र, वाणिज्य, मूलभूत विज्ञान, शेती व पशुसंवर्धन,अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र व औषधशास्त्र प्रकारातील या महोत्सवात ३६ पदव्युत्तर संशोधक, शिक्षक, विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते.
राज्यस्तरीय महोत्सवासाठी ४८ स्पर्धकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात दि. १५ ते १७ जानेवारीदरम्यान राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सव होणार आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर, शिक्षक आदी गटांतून एकूण ४८ स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठातील महोत्सवाचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव यांनी दिली.