विश्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर शहर हा कुण्या एका पक्षाचा नव्हे, तर विरोधी विचारांचा बालेकिल्ला असल्याचेच मागील अकरा विधानसभा निवडणूक निकालांवर नजर टाकल्यास ठळकपणे दिसते. या अकरा निवडणुकांत काँग्रेसचा तीन वेळा, शेकापचा दोनवेळा व जनता दलाचा एकदा असा डाव्या-पुरोगामी विचारांचा सहा वेळा विजय झाला आहे. शिवसेना पाचवेळा जिंकली आहे.
काँग्रेसचे उमेदवार मालोजीराजे यांना २००४ च्या निवडणुकीत ७६१५७ मते पडली होती. ते २८१४२ मतांनी विजयी झाले होते. मागील अकरा निवडणुकांत हे सर्वाधिक मतांचे व मताधिक्याचेही रेकॉर्ड आजही कायम आहे.
कोल्हापूरच्या राजकारणात वारे फिरवण्याची ताकद आहे. त्याचे प्रत्यंतर अनेक वेळा आले आहे. त्यामुळे देशात कोणती लाट आहे, त्याचे पडसाद कोल्हापूरच्या राजकारणावर पडतीलच असे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड लाट होती; परंतु तरीही त्या निवडणुकीत कोल्हापूरने राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना विजयी केले. त्याच वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीतही कोल्हापूरने शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना गुलाल दिला.
आतापर्यंतच्या सर्व लढतींत फक्त २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतच शिवसेना-भाजपला दोन्ही काँग्रेससह पुरोगामी पक्षांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. हे शहर कधीकाळी शेका पक्षाचा बालेकिल्ला होता. नंतर डाव्या-पुरोगामी विचारांमध्ये दुफळी होत गेली तशी शिवसेनेचे वर्चस्व वाढल्याचे चित्र दिसते. कोल्हापूर कुणाला विजयी करायचे यापेक्षा कुणाला पराभूत करायचे याचा निर्णय अगोदर घेत असल्याचे अनेकदा प्रत्यंतर आले आहे.
गेल्या निवडणुकीतही काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांचा विजयही त्याच लाटेतून झाला. कोल्हापूर शहर मतदार संघात काँग्रेसने पहिल्या निवडणुकीपासून लक्षणीय मते घेतली आहेत. परंतु या पक्षाने या मतदार संघाची कधीच मनापासून बांधणी केलेली नाही. पक्षाचे सर्व प्रभागांत नेटवर्क उभारण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. मालोजीराजे २००४ ला पहिल्याच लढतीत मोठ्या मतांनी विजयी झाले; परंतु पाच वर्षांत लोकांना त्यांचा जो अनुभव आला, तोच त्यांच्या २००९ च्या पराभवास कारणीभूत झाला. त्याबद्दलची जाणीव त्यांना १३ वर्षांनी गेल्या आठवड्यात झाली.
पक्षीय कुरघोडीचे राजकारण, संघटना बांधणीकडे झालेले दुर्लक्ष आणि प्रत्येक वेळी नवखा उमेदवार हीच काँग्रेसची या मतदार संघातील पराभवाची कारणे आहेत. काँग्रेसचा विचार मानणारा मतदार चांगल्या संख्येने कोल्हापूर शहरातही आहे, त्याचा सांभाळ करण्याचे काम या पक्षाला जमलेले नाही हे मात्र खरे.
महिला आमदार नाहीकोल्हापूरने अनेक चांगले पायंडे राज्याला व देशाला घालून दिले; परंतु या शहराने आजपर्यंत महिलेला आमदार केलेले नाही. अनेक महिलांनी या शहराचे महापौरपद भूषविले, काँग्रेसनेच यापूर्वी १९९५ ला शिवानी दिलीप देसाई यांना उमेदवारी दिली. परंतु त्यांनाही विजयी होता आले नाही. कोणत्याच पक्षाने सक्षम उमेदवार म्हणून महिलांचा विचार केलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र आतापर्यंत विमलाबाई बागल, सरोजिनी खंजिरे, संजीवनी गायकवाड, संध्यादेवी कुपेकर यांनी विधानसभेत तर निवेदिता माने यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे.
कोण किती साली जिंकले
- १९७२ : त्र्यं. सी. कारखानीस(शेकाप)
- १९७८ : रवींद्र सबनीस (जनता पक्ष)
- १९८० : लालासाहेब यादव (काँग्रेस)
- १९८५ : प्रा. एन. डी. पाटील (शेकाप)
- १९९० : दिलीप देसाई (शिवसेना)
- १९९५ : सुरेश साळोखे (शिवसेना)
- १९९९ : सुरेश साळोखे (शिवसेना)
- २००४ : मालोजीराजे छत्रपती (काँग्रेस)
- २००९ : राजेश क्षीरसागर (शिवसेना)
- २०१४ : राजेश क्षीरसागर (शिवसेना)
- २०१९ : चंद्रकांत जाधव (काँग्रेस)