कोल्हापूर : कला, वाणिज्य विद्याशाखेची सेमिस्टर (सत्र) परीक्षा पद्धत बंद करावी, असा ठराव शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत मंगळवारी (दि. २७) एकमताने मंजूर झाला. मात्र, या ठरावाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी परीक्षा मंडळ आणि विद्या परिषद या अधिकार मंडळांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील एकूण १४७ महाविद्यालये शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित आहेत. एकूण २ लाख ४२ हजार ८९७ विद्यार्थी-विद्यार्थिनी विद्यापीठाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेत आहेत. विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्राद्वारे २६ हजार ७१५ विद्यार्थी-विद्यार्र्थिनी शिकत आहेत.
दहा वर्षांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठाने सत्रपद्धती स्वीकारली. सध्या सर्वच विद्याशाखा आणि अभ्यासक्रमांच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने होत आहेत. सेमिस्टरमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांना वर्षातून दोन वेळा परीक्षांचे कामकाज करावे लागत आहे.
शिक्षक, विद्यार्थी यांचा अधिकतर वेळ परीक्षांमध्ये व्यतीत होत आहे. कला, वाणिज्य परीक्षांमध्ये सेमिस्टर पद्धतीमुळे सर्व विद्यार्थी व महाविद्यालये शिक्षणार्थीऐवजी परीक्षार्थी झाली आहेत. त्यामुळे या विद्याशाखांची सेमिस्टर बंद करावी, याबाबत ठराव मंगळवारी (दि. २७) अधिसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला.
अधिसभेतील हा ठराव आता विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर चर्चेसाठी मांडण्यात येईल. यानंतर पुन्हा संबंधित ठराव विद्या परिषदेमध्ये सादर होईल. या दोन्ही अधिकार मंडळांनी जर सेमिस्टर बंद करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आणि कुलपतींनी त्याला मान्यता दिली, तरच कला, वाणिज्य शाखेच्या परीक्षा वार्षिक पद्धतीने होतील.
सकारात्मक निर्णय झाल्यास पहिल्यांदा पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सत्र पद्धतीने होतील. त्यानंतर द्वितीय आणि तृतीय वर्षाला संबंधित पद्धती लागू होईल. दरम्यान, कला आणि वाणिज्य शाखेसह विज्ञान शाखेचीही सेमिस्टर बंद करण्याची मागणी शिक्षक, विद्यार्थ्यांतून झाली आहे.
वर्षभरात ११६८ परीक्षाप्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यापीठ हिवाळी व उन्हाळी सत्रांत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविकांच्या ११६८ परीक्षा घेते. त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी, आदी नऊ विद्याशाखांतील १८६ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. सुमारे पावणेसहा लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी या परीक्षा देतात. सत्र पद्धतीच्या परीक्षा ४२-४५ दिवसांमध्ये घेण्यात येतात.