कोल्हापूर :आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या बहिरेवाडी (ता. आजरा) येथील स्मारकस्थळी शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या नुक त्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही या अनुषंगाने चर्चा झाली असून, यासाठी ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन काही आचारसंहिता करता येईल का, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांतून हे भव्य स्मारक बहिरेवाडी येथे उभारण्यात आले असून, गेल्याच महिन्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमातही स्मारकस्थळावरील देखण्या इमारतीचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली होती.हाच धागा पकडून शाहूवाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य भगवान पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हे स्मारक पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत, या ठिकाणी जिल्हा परिषदेने शैक्षणिक उपक्रम घेण्याची मागणी केली होती.
यावेळी शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनीही एक चांगले स्मारक झाल्याची भावना व्यक्त करीत बहिरेवाडी ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन जिल्हा परिषदेमध्ये एक बैठक घेऊन या स्मारकस्थळी कार्यक्रम घेण्याबाबत एक आचारसंहिता तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.प्राथमिक, माध्यमिक आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीने वर्षभराचे नियोजन करून या ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करणे शक्य आहे. शिक्षकांच्या बैठका, मेळावे, प्रशिक्षणे, विविध पुरस्कारांचे वितरण असे शिक्षण क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम घेणे आवश्यक आहे.
आवश्यक साधनांची गरजअसे कार्यक्रम घेण्यासाठी आवश्यक ध्वनियंत्रणा, बैठक व्यवस्था यांचीही येथे सोय करणे आवश्यक आहे. सध्या केवळ दोनच सभागृहे येथे उपलब्ध असून, त्यांसाठीही पूरक यंत्रणा उभारण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे.