कोल्हापूर : जबरी व वाहन चोरी प्रकरणी तिघांना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २४) रात्री कसबा बावडा येथील नदीघाटाजवळ अटक केली.श्रावण भुजप्पा बुचडे (वय २०, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा, कोल्हापूर), राहुल भरत कसबे, (२२, रा. त्र्यंबोलीनगर, लाईन बाजार, कोल्हापूर) व हणमंत प्रकाश कांबळे (२४, रा. हनुमाननगर, सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून जबरीने चोरलेला एक व तीन असे चार मोबाईल, चोरीची दुचाकी व गुन्हा करण्याकरिता वापरलेली दुचाकी, असा एकूण एक लाख ६५ हजार रुपयांचा माल जप्त केला.पोलिसांनी सांगितले की, ताराबाई पार्क येथील अनिल शेलार हे गोव्याहून कोल्हापुरात पाच मे २०१८ ला मध्यवर्ती बसस्थानक येथे आले. रिक्षाथांब्यावरून ते रिक्षातून घरी गेले. त्यावेळी त्यांचा मोबाईल रिक्षात विसरला. त्यामुळे ते पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक येथे आले.
अनिल शेलार यांनी आपल्या मोबाईलवर फोन केला असता फोनमधून त्यांना ‘शिवीगाळ करीत तुम्हाला मोबाईल पाहिजे असेल तर भगवा चौकात या’ असे सांगितले. त्यामुळे ते दुसरी रिक्षा करून सासने मैदान येथून जात असताना त्यांना पहिला रिक्षावाला दिसला. त्यांनी त्याला अडविले.
त्यावेळी रिक्षाचालक जुबेन शेख (रा. सोमवार पेठ) यांनी, तुमचा रिक्षात विसरलेला मोबाईल व माझा मोबाईल असे दोन मोबाईल आणि माझी थोडी रक्कम जबरदस्तीने घेऊन तिघे अज्ञात गेले असल्याचे शेलार यांना सांगितले. त्यानंतर अनिल शेलार यांनी फिर्याद दिली.या प्रकरणाचा तपास करीत असताना चोरलेल्या मोबाईलमधील एक मोबाईल अॅक्टिव्ह झाला. त्याप्रमाणे शुक्रवारी रात्री कसबा बावड्यातील नदीघाटाजवळ त्याना पकडले. त्यांच्यावर जबरी चोरी व एक वाहन चोरीचा असे दोन गुन्हे दाखल आहेत. संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. शनिवारी न्यायालयाने या तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहायक निरीक्षक बालाजी भांगे व गुन्हे शोध पथकाने केली. तपास सहायक फौजदार दिलीप चौधरी करीत आहेत.