सचिन भोसलेकोल्हापूर : पेशवेकाळापासून भाद्रपदातील गणेशोत्सव चतुर्थीपासून दशमीपर्यंत थाटाने साजरा होत असे. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप दिले. यात सर्वांनी एकत्रित येऊन इंग्रजी सत्तेचा बीमोड करावा, ही एकी कायम राहावी, या उद्देशाने त्यांनी हा उत्सव सुरू केला. यात सार्वजनिक गणपती बसवून त्याच्यापुढे ज्ञान-विज्ञानाची व्याख्याने करावीत. राष्ट्रीय जागृतीचे पोवाडे गाणारे मेळे काढावेत.
कथा, कीर्तन, प्रवचने यांच्याद्वारे राष्ट्रात देशभक्तीचा जागर करावा. त्या निमित्ताने संघटना बांधाव्यात... अशा प्रकारे दहा दिवस उत्सव साजरा करण्याचा मंत्र दिला. स्वातंत्र्य आंदोलनात गणेशोत्सवाचे महत्त्व अधोरेखित आहे. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी उडी घेत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. चैतन्यदायी उत्सव म्हणून तो आजही अखंडपणे सुरू आहे. मात्र, त्यात कालांतराने बदलत्या प्रवाहामुळे त्याचे स्वरूप बदलते राहिले आहे. यात केवळ कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि झगमगाट उरला आहे. बदलत्या काळात स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. काम कोणतेही असो; त्यात त्या अग्रेसर आहेत.
अंतराळयान, लष्करी विमानोउड्डाण, स्पेस वॉक, रेल्वे, रणगाडे, वैद्यकीय सेवा, जोखमीच्या सर्व क्षेत्रांत त्या पुरुषांच्या बरोबरीने संकटांना सामोरे जातात. एवढेच काय, १२० कोटी जनता असलेल्या भारताचे संरक्षण मंत्रिपदही एका महिलेकडेच आहे. जगातील पोलादी महिला म्हणून स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे आजही आदराने पाहिले जाते. एवढेच काय, अंतराळात अनेक महिने राहण्याचा विक्रमही एका भारतीय वंशाच्या महिलेनेच नोंदविला आहे. अनेक क्षेत्रांत त्या अग्रेसर आहेत. तरीही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही केल्या बदलत नाही. ‘मुलगी नको, मुलगाच हवा’ म्हणून अनेकांचा अट्टहास असतो. प्रत्येकाला ‘झाशीची राणी’ आपल्या घरात जन्मावीशी वाटत नाही, त्याचाच प्रत्यय आजही येतो.
स्त्रीभ्रूणाच्या हत्येसाठी उच्चशिक्षितच मदत करीत असल्याचे चित्र उभे आहे. काळ बदलला तरीही महिलांना समानतेचे स्थान मिळत नाही. सरकारने महिला आरक्षण सर्वत्र केले. राजकारणातही गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक सन्माननीय महिला ग्रामपंचायत सदस्य ते खासदार पदापर्यंत काम करीत आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या वतीने त्यांचे पती, मुलगा, भाऊ असे अन्य पुरुष नातेवाईकच ही सत्ता चालवीत आहेत. एवढेच काय, सार्वजनिक मंडळांमध्ये महिलांनी चालविलेले मंडळ आणि त्यांच्या अधिपत्याखाली पुरुष मंडळींनी काम केल्याची उदाहरणे कमीच पाहण्यास मिळतील. कोल्हापूरचा विचार करता, मंगळवार पेठेतील सणगर गल्ली परिसरातील ‘जंगी हुसेन तालीम’ काही वर्षांपूर्वी महिलांनी चालविण्यात घेतली. यात पदाधिकारीही महिलाच बनल्या. याच पेठेतील प्रिन्स क्लबनेही मागील वर्षी या पुरोगामी शहरात नवा पायंडा पाडला. यात या क्लबने महिला व मुलींना पदाधिकारी केले आणि गणेशोत्सवाची खऱ्या अर्थाने शान वाढविली. अशा पद्धतीने जिल्'ातील सार्वजनिक मंडळांनी कधी आपल्या आई, बहीण, पत्नी, सासू, सून, आजी वा अन्य महिलांना असा मान कधी दिला का? हा प्रश्न मनाला विचारावा. महिलांचे काम केवळ घरकाम, नोकरी करण्यापुरतेच राहिले आहे का? महिलांनाही योग्य तो सन्मान का दिला जात नाही? स्त्री-पुरुष समानतेचा जागर खºया अर्थाने कधी होणार? खेळ, राजकारण, सामाजिक, व्यवसाय, उद्योग अशा विविध क्षेत्रांत भरारी मारलेल्या यशस्वी व्यक्ती आपल्या मनोगतात ‘मी यशस्वी झालो त्यापाठीमागे माझी आई, पत्नी आहे,’ असे अनेकजण वारंवार उल्लेख करतात.
मात्र, एका स्त्रीच्या यशात माझ्यामागे खंबीरपणे पती, सासरे, मुलगा, आदींनी साथ दिल्याचे कमीच ऐकायला मिळते. प्रत्येक स्त्रीला विविध क्षेत्रांत भरारी घेताना अनेक दिव्ये पार करावी लागतात; कारण आजही स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही. मनुष्याला तो मग कुठल्याही जातिधर्माचा वंशाचा असो त्याला ठेच अथवा काही लागले तर प्रथम आईचेच नाव त्याच्या तोंडी येते. २१व्या शतकातही अनेकांना बायको पाहिजे. मात्र, मुलगी नकोशी झाली आहे. येत्या काळात मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेता लग्न करताना वराकडील मंडळींना मुलीकडच्यांना हुंडा द्यावा लागेल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
एका संस्कृत श्लोकात ‘यत्र पूज्यंते नार्यस्त रमन्ते तत्र देवत:.’ अर्थात जिथे स्त्रियांचा आदर, सन्मान यथार्थपणे केला जातो, तिथे देवतेचा वास निरंतर राहतो, असे म्हटले जाते. म्हणूनच ईश्वरापेक्षा आईला श्रेष्ठ स्थान आहे. देवकी नसती तर श्रीकृष्ण, देवी पार्वती नसती तर गणपती, कार्तिकेय; जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज, भीमाबाई नसत्या तर डॉ. बाबासाहेब, पुतळीबाई नसत्या तर गांधीजी जन्मले असते का? आई, पत्नी, मुलगी, बहीण आणि समाजातील महिलांना सन्मानाची वागणूक द्या. भारतभूमीलाही आपण आपली आईच मानतो; मग ‘ति’ला सन्मान का देत नाही? प्रत्येक कार्यात ‘ति’ला समानतेचा दर्जा द्या. मग बघा, आयुष्यात प्रगतीच प्रगती होईल. म्हणूनच आजपासूनच अशा शुभकार्याचा श्रीगणेशा करा...!