कोल्हापूर : सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) व कोल्हापूर जिल्हा अखिल भारतीय किसान सभातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी रास्ता रोको केला; त्यामुळे पोलिसांनी रस्ता अडविणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यात आशा वर्क र्स व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांना विरोध करीत दसरा चौक येथून शेकडो कार्यकर्त्यांनी प्रथम दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात आतमध्ये सोडा, असे म्हणत होते.
मात्र, पोलिसांनी आंदोलकांना थांबवून ठेवले; त्यामुळे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात चारी बाजूंनी येणारी वाहतूक अडवत रास्ता रोको केला. वाहतुकीचा खोळंबा झाल्याने पोलिसांनी शेकडो महिला, पुरुष कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हा मोर्चा मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्या, कष्टकरी शेतकरी व शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती करा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची कायदेशीर हमी द्या. वनाधिकार कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करा. असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षितता व सुविधा द्या. ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठी जाहीर केलेल्या माथाडी बोर्डाची अंमलबजावणी करा. आशा व गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करून किमान वेतन सुरू करा. बांधकाम कामगारांना महामंडळा अंतर्गत सामाजिक सुरक्षा सुविधा द्या, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात ए. बी. पाटील, शंकर काटाळे, भरमा कांबळे, दिनकर आदमापुरे, राजेश वरक, अमोल नाईक, प्रशांत सावंत, वर्षा कुलकर्णी, आण्णासाहेब चौगले , नेत्रदीपा पाटील आदी सहभागी झाले होते.