कोल्हापूर : टोल रद्द न झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा मंत्र्यांनी दिला आहे. गेल्या चार वर्षांत जे केले नाही, ते या उरलेल्या दोन महिन्यांत, जे काही वजन वापरायचे ते वापरून टोल रद्द करा. उगाचच राजीनाम्याने नाटक करू नका. असे करून पुढील दोन महिन्यांसाठी जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन कोल्हापूर जनशक्तीच्या वतीने सुभाष वोरा व समीर नदाफ यांनी पत्रकाद्वारे केले आहे. टोलविरोधात गेली चार वर्षे जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. या काळात शासन आणि प्रशासनाने सातत्याने जनतेच्या विरोधी भूमिका घेऊन आय.आर.बी.ची तळी उचलली आहे. शासनाचे प्रतिनिधी या नात्याने कोल्हापुरातील दोन्ही मंत्र्यांना वेळोवेळी निवेदने देऊन जनतेने साकडे घातले. परंतु, चार वर्षे लाल दिव्याच्या गाडीत बसून मंत्रिपदाची ऐट मिरवणारे मंत्री केवळ तोंडदेखलेपणाने या आंदोलनाला सामोरे गेले आहेत. आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांना खोटे आश्वासन देऊन, टोल पंचगंगेत बुडवल्याचा दावा करून त्यांची दिशाभूल केली व आंदोलन मागे घ्यावयास लावले. सातत्याने जनतेबरोबर आहोत असे आश्वासन देऊन शासनाच्या निर्णयाची इमानेइतबारे अंमलबजावणी करणार्या मंत्र्यांना गेल्या चार वर्षांत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची उपरती कधी झाली नाही. परंतु, पुढील दोन महिन्यांनंतर राज्य विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने लाल दिवे उतरून गाड्या सरकारदरबारी जमा कराव्या लागणार आहेत. तेव्हा चार वर्षांत जे केले नाही, ते केवळ दोन महिन्यांकरिता करून जनतेसाठी इतके कष्ट घेऊ नका. कोल्हापुरातील मंत्र्यांनी ओठात एक व पोटात एक अशीच भूमिका घेतली आहे. चार वर्षे जनतेसाठी जे केले नाही, ते या दोन महिन्यांत राज्य सरकारकडे वापरून पहा; अन्यथा कोल्हापूरची जनता सार्वभौम आहे. येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये याचा काय घ्यायचा तो निर्णय जनताच घेईल, असे पत्रकात म्हटले आहे.
दोन्ही मंत्र्यांकडून राजीनाम्याचे नाटक कोल्हापूर जनशक्ती : जनतेची फसवणूक करू नका
By admin | Published: May 09, 2014 12:38 AM