कोल्हापूर: भूमाता संघटनेने रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रदुषणमुक्त पंचगंगा जागर कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत नदीच्या संगमापासून कुरुंदवाड ते उगमापर्यंत प्रयाग चिखली येथेपर्यंत नदीकाठावरुन पायी चालत जाउन लोकांमध्ये नदी वाचवण्यासाठी जागर केला जाणार आहे,अशी माहिती संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.
प्रेस क्लबमध्ये झालेल्या बैठकीत शिरोळचे आमदार उल्हास पाटील, सौ. शालिनी मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती.४ जानेवारीला कुरुंदवाड येथून सुरुवात होणार आहे. इचलकरंजी, वळीवडे, प्रयाग चिखली या ठिकाणी भेटी दिल्यानंतर ७ जानेवारीला शाहू स्मारक भवनमध्ये सांगता कार्यक्रम होणार आहे.साताऱ्याचे खासदार उदयनराजे, क्रिकेटपटू कमल सावंत, नेमबाज राही सरनोबत यांच्यासह अनेक मान्यवर या जागर यात्रेत सहभागी होणार आहेत.पंचगंगा नदीला मरणासन्न अवस्थेतून गतवैभवाकडे नेण्यासाठी प्रदुषणाची नदीकाठची ठिकाणे संगमापासून उगमापर्यंत सर्वांनी पाहावीत आणि आपण स्वत: या प्रदुषणात सहभागी होणार नाही याची जाणिव व्हावी या हेतूने हा उपक्रम हाती घेतला आहे.
नदी पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रदुषण रोखणे हाच एकमेव उपाय आहे, त्यासाठी भूमाता संघटनेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी जागर यात्रा हा त्यापैकीच एक आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून नदी स्वच्छ कशी करता येईल बाबतीत प्रबोधन केले जाणार आहे.