कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून जवाहरनगर परिसरातील छोट्या सात ते आठ वसाहतींमध्ये डेंग्यूची साथ कमी होण्याऐवजी अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. या साथीमुळे नागरिक अक्षरश: बेजार झाले आहेत.जमादार कॉलनी, सरनाईक वसाहत, सासने कॉलनी, आदी ठिकाणी डेंग्यूचे सुमारे ४० संशयित रुग्ण सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे रविवारी नागरिकांनी सांगितले. यापूर्वी महापालिका प्रशासनाने जवाहरनगर परिसरात औषध फवारणी, गटारींची स्वच्छता करूनही डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करूनही ती फोल ठरत आहे.जवाहरनगर परिसरात सासने-जमादार कॉलनी, यादव कॉलनी, सरनाईक वसाहत, जवाहरनगर मुख्य रस्ता या ठिकाणी सुमारे पाचशे ते सहाशे लोकवस्ती आहे. साधारणत: २० हजारांवर लोकसंख्या आहे. गेल्या महिन्याभरापासून डेंग्यूची साथ आहे.
ती आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने सर्व्हे केला. त्याचबरोबर औषध फवारणी, गटारींची स्वच्छता केली तसेच टायरी अथवा बॅरेलमध्ये पाण्याची साठवणूक करू नये, असे आवाहन केले; पण या परिसरात अद्याप डेंग्यूची साथ असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.दरम्यान, याबाबत महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.
रक्ताचा अहवाल कधी?ज्या ठिकाणी डेंग्यूची साथ जास्त आहे, त्या भागातील पाच ते सहा नागरिकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी महापालिका प्रशासनाने घेतले होते. याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता, ‘तुमचा अहवाल निगेटिव्ह आला असल्या’चे तोंडी उत्तर महापालिकाकडून त्यांना देण्यात आले. आजअखेर या रक्त तपासणीचा अहवाल महापालिकेकडून आला नसल्याचे नागरिकांकडून यावेळी सांगण्यात आले.ही घ्या काळजी...
- * पाणी उकळून प्या.
- * पाणी फिल्टर करून प्या.
- * टायर व बॅरेलमध्ये पाणी साठवून ठेवू नका.
गटारींची स्वच्छता नाही, औषध फवारणी कधीतरी होतेय. ती वेळेवर व्हावी.-दिलावर लाटकर,जमादार कॉलनी, कोल्हापूर.
शहरात यापूर्वी डेंग्यूबाबत सर्व्हे करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयात सध्या डेंग्यूचे किती संशयित आहेत, याची माहिती नाही आहे. ती रुग्णालयाने दिलेली नाही.- डॉ. दिलीप पाटील, प्रभारी आरोग्याधिकारी, कोल्हापूर महापालिका.