कोल्हापूर : गणेशोत्सवातील पहिलाच रविवार सुटीचा मिळाल्याने अनेक गणेशभक्तांनी केवळ आकर्षक गणेशमूर्ती पाहण्याचा आनंद लुटला. त्यामुळे सायंकाळनंतर राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी चौक येथे गणेशभक्तांनी गर्दी केली होती.गणेशोत्सवात घरगुती गणेशमूर्ती व गौरी विसर्जनानंतर सार्वजनिक मंडळांचे देखावे सर्वांसाठी खुले केले जातात. यंदा देखावे मंगळवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यात गणेशोत्सव काळातील पहिलाच रविवार सुटीचा मिळाल्याने अनेक कुटुंबांनी केवळ आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास पसंती दिली.
मंगळवारनंतर शहरातील शिवाजी पेठ परिसरातील दयावान गु्रपची कमान, बुवा चौकातील मित्रप्रेम तरुण मंडळ, रंकाळा टॉवर मित्रमंडळ (सजीव देखावे), मंगळवार पेठेतील अनेक मंडळांचेही सजीव देखावे, तर शिवाजी उद्यमनगर परिसरातील मदनलाल धिंग्रा तरुण मंडळचा ‘सिंच्यान’, जय शिवराय तरुण मंडळाचे ३० फुटी अवकाशयान व स्पेस सेंटर असे तांत्रिक देखावेही उद्या, मंगळवार अथवा बुधवारी पाहण्यास खुले होतील.