- संदीप आडनाईक कोल्हापूर - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये वन्यजीव संशोधकांच्या तुकडीला जंपिंग स्पायडरच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. जंपिंग स्पायडरच्या या नव्याने शोधलेल्या कोळ्याच्या प्रजातीला या संशोधकांनी सिंधुदुर्गाचे नाव दिले आहे. 'स्पारम्बाबस सिंधुदुर्ग असे या प्रजातीचे नाव आहे.सिंधुदुर्गातील संशोधक गौतम कदम यांनी या प्रजातीवरील संशोधन केले आहे. त्यांच्यासोबत केरळच्या क्राईस्त कॉलेजचे संशोधक ऋषिकेश त्रिपाठी, आशा तेरेसा आणि अंबाल परम्बील सुधिकुमार यांनी एकत्रितपणे ही प्रजात शोधली आहे. याविषयावरील शोधप्रबंध झूटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालीकाने प्रकाशित केला आहे.
भारतामधील नव्या प्रजातीची पहिलीच नोंदही प्रजात या संशोधनापूर्वी फेशिअस या प्रवर्गातील समजली जात होती. यापूर्वी चीन आणि मलेशियामधूनही या कोळ्याच्या प्रजातींची नोंद झाली होती. मात्र, बारकाईने केलेल्या निरिक्षणानंतर ही प्रजात स्पारम्बास असल्याचे ऋषिकेश त्रिपाठी आणि गौतम कदम यांच्या निदर्शनास आले. चीन आणि मलेशियामध्ये झालेल्या नोंदींनंतर ही भारतामधील नव्या प्रजातीची पहिलीच नोंद आहे.
नव्याने शोधलेली कोळ्याची ही प्रजात झाडाच्या बुंध्यावर किंवा बांबुच्या गवतांवर मुख्यत्वे आढळते. नर आणि मादी हे वेगवेगळी शिकारीची ठिकाणे वापरत असुन ते गुप्तपणे शिकार करतात. या नवसंशोधित कोळ्याच्या प्रजातीमुळे पश्चिम घाटातील जैवविविधताच पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.-गौतम कदम(संशोधक, कुडाळ, सिंधुदुर्ग)