कोल्हापूर : अन्न-औषध प्रशासन विभागाने गुरुवारी बाजार समितीमधील गूळ व्यापाऱ्यांवर थेट कारवाई केल्याने व्यापाऱ्यांनी गूळ खरेदी न करण्याची भूमिका घेतली आहे. शनिवारी सौद्यात न उतरण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला; पण समिती प्रशासनाने मध्यस्थी करत सौदे सुरळीत केले. त्यानंतर अन्न-औषध विभागाशी चर्चा करून शेतकरी, अडते, व्यापाऱ्यांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला.गुळाचे उत्पादन करताना त्यातील घटकांचे प्रमाण नियमाने राखले जाते का? गूळ खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे परवाना आहे का? याबाबतची तपासणी करण्यासाठी अन्न-औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) केंबळकर यांची टीम गुरुवारी समितीत गेली. यावेळी त्यांनी गुळातील घटकांची तपासणी केली. यामध्ये गुळातील सल्फरचे प्रमाण १२० टक्क्यांपर्यंत आढळले.
नियमाने हे प्रमाण ७० टक्के अपेक्षित असते. त्याचबरोबर गुळातील घटकांचे प्रमाण रव्यावर चिकटवणे बंधनकारक आहे. त्यात व्यापाऱ्यांकडे अन्न-औषध विभागाचा परवाना नसल्याने त्यांनी तीन व्यापाऱ्यांना नोटिसा काढल्या.
गुळाचे उत्पादन शेतकरी करतात, मग शिक्षा आम्हाला का? अशी विचारणा करत सौदे न काढण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. शनिवारी सौद्यापूर्वी व्यापाऱ्यांनी थोडे आढेवेढे घेतले; पण अन्न-औषध प्रशासनाशी चर्चा करण्याचे आश्वासन समितीने दिल्याने सौदे सुरळीत झाले.त्यानंतर शेतकरी, व्यापारी, अडत्यांची बैठक झाली. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना बोलाविण्याचा निर्णय झाला; पण सहायक आयुक्त केंबळकर यांनी नंतर बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
अन्न-औषध प्रशासनाने तीन व्यापाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. याबाबत शेतकरी, व्यापारी, अडते व अन्न-औषध प्रशासन या घटकांशी चर्चा करण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.- मोहन सालपे,सचिव, बाजार समिती