कोल्हापूर : जागतिक प्रदूषण प्रतिबंध दिनानिमित्त असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्सतर्फे जयंती नदी ते गोमती नदीतीरावर परिक्रमा काढण्यात आली. या परिक्रमेचा मार्ग हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर असा होता. पायलट प्रोजेक्ट म्हणून या मार्गाचा परिसर प्रदूषणमुक्त करण्याचा उपक्रम असोसिएशनतर्फे राबविला जाणार आहे.असोसिएशनने ‘जागे व्हा पंचगंगेसाठी’ या मोहिमेचा भाग म्हणून जयंती नदीचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्याचे ठरविले आहे. त्याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर या मार्गाची निवड केली आहे.
अंदाजे १४.७ किलोमीटर म्हणजे कात्यायनी ते कळंबा कारागृह हा भाग अजूनही फारसा प्रदूषित झालेला नाही. तो त्याच पद्धतीने राहावा यासाठी प्रस्ताव तयार करणे सुरू आहे. उर्वरित प्रदूषित भागापैकी असोसिएशनने पायलट प्रोजेक्टसाठी निवडलेल्या भागामध्ये लवकरच प्रत्यक्ष कामाची सुरुवात करणार आहे.
असोसिएशन आॅफ टेक्नोक्रॅटस्चे अध्यक्ष राजेंद्र सावंत म्हणाले, कॉर्पोरेशनची ड्रेनेज सिस्टीम सन १९७० च्या आसपास अस्तित्वात आली आहे. त्यावेळी जयंती नदीमध्ये स्वच्छ पाणीवहन होत होते. आज महानगरपालिकेची ड्रेनेज सिस्टीम असताना जयंती नदीची ही अवस्था आहे, तिचा विचार व्हावा.यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टचे विजय कोराणे, या प्रकल्पाच्या समन्वयक वंदना पुसाळकर, इंजिनिअर आर. के. पाटील, नगरसेवक विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, असोसिएशनचे माजी अध्यक्ष संदीप घाटगे, सदस्य प्रसाद मुजुमदार, महेश जाधव यांनी मते मांडली.
यावेळी अतुल दिघे, जीवन बोडके, सुधीर हंजे, महेश ढवळे, श्रीकांत भोसले, मंदार आंबेकर, अनिल घाटगे, प्रशांत काटे, प्रमोद पवार, विजय पाटील, सुनील मांजरेकर, प्रशांत हडकर, आदी उपस्थित होते.
निधी देणारया परिक्रमेच्या प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवक विजय सूर्यवंशी यांना मोबाईलवरून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.