कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धा सोमवार (दि. २६) ते शुक्रवार (दि. ३०) दरम्यान होणार आहे. त्यामध्ये पश्चिम विभागातील ६८ विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत. विद्यापीठाला या स्पर्धेचे तिसऱ्यांदा यजमानपद मिळाले आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजतर्फे (एआययू) ही पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. यावर्षीच्या स्पर्धेचे यजमानपदाचा मान शिवाजी विद्यापीठाला मिळाला आहे. विद्यापीठाने यापूर्वी दोनवेळा या स्पर्धेचे यजमानपद सांभाळले आहे. प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, या स्पर्धेचा प्रारंभ सोमवारपासून होणार आहे.
विद्यापीठातील लोककला केंद्रात स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये यजमान शिवाजी विद्यापीठासह मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, अजमेर, ग्वाल्हेर, रोहतक, जबलपूर, आदी ६८ विद्यापीठांचे संघ असणार आहे. त्यामध्ये प्रो-कबड्डीमध्ये खेळणाºया कबड्डीपटू असणार आहेत. सकाळी सात ते दुपारी १२ आणि दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत स्पर्धेतील सामने होणार आहेत. बाद फेरीनंतर साखळी फेरीतील सामने होतील. रोज २४ सामने होणार आहेत. स्पर्धेचा समारोप शुक्रवारी होणार आहे. या पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, आदी उपस्थित होते.