कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण होत आले असून दसरा ते दिवाळी या दरम्यान या योजनेचे लोकार्पण करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी महानगरपालिकेत केली. या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना निमंत्रित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूरकरांच्या दिवाळीचे अभ्यंगस्नान थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्याने होणार असल्याने मला आनंद झाला असल्याचेही ते म्हणाले.काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ सोमवारी दुपारी महानगरपालिकेत गेले होते. आढावा बैठक झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांनी योजनेच्या लोकार्पणाचा मुहुर्त सांगून टाकला.२०१०-२०१५ याकाळात सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडी सरकारने कोल्हापूरकरांच्या स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठ्यासाठी ४८८ काेटींची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर केली होती. आता या योजनेचे काम पूर्ण झाले असून विजयादशमी दिवशी काळम्मावाडी धरणातील पाणी जलवाहिनीद्वारे पुईखडी येथील जलशुध्दीकरण केंद्रात घेण्यात येईल. त्यानंतर दसरा ते दिवाळी दरम्यान योजनेचे पाणी शहरवासीयांना दिले जाणार आहे.सतेज पाटील यांना बोलविणारयोजना मंजूर होण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत महाविकास आघाडीचे नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य झाले. त्यामुळे योजनेचे श्रेय कोणाचे यापेक्षा जनतेला पाणी मिळतेय हे माझ्यादृष्टीने महत्वाचे आहे, असे मुश्रीफ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. माजी पालकमंत्री सतेज पाटील आमदार असल्याने त्यांनाही लोकार्पण सोहळ्यास बोलविण्यात येईल, असेही मुश्रीफ म्हणाले.
Kolhapur: काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या लोकार्पणाचा मुहुर्त ठरला, पालकमंत्र्यांनी केली घोषणा
By भारत चव्हाण | Published: October 09, 2023 3:53 PM