कोल्हापूर : करवीर नगरीच्या कला, शिल्प परंपरेत भर घालणाऱ्या कोल्हापूर आर्ट फौंडेशनतर्फे आयोजित कलामहोत्सवातील विविध कलाकृती, क्षण सुमारे अकराशे शालेय विद्यार्थ्यांनी रविवारी चित्रांतून उलगडला. सुट्टीचा दिवस असल्याने या महोत्सव पाहण्यास गर्दी झाली. रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध कलाकृतींची खरेदीही त्यांच्याकडून होत आहे.येथील दसरा चौकातील मैदानावर सुरू असलेल्या कलामहोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात रविवारी सकाळी बालचित्रकला स्पर्धेने झाली. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी विविध चार गटांतून या स्पर्धेत सहभागी झाले. त्यांना ‘कलामहोत्सव’ हा विषय देण्यात आला होता.
या स्पर्धकांनी सकाळी दहा ते अकरा या वेळेत महोत्सवाची पाहणी केली. त्यानंतर त्यांना आवडलेल्या स्टॉल, कलाकृतींसमोर बसून त्यांनी महोत्सवातील विविध चित्रे, शिल्पकृती, प्रसंग, क्षण, आदी चित्रांच्या माध्यमातून स्वत: रेखाटले. आपले पालक, मित्र-मैत्रिणींसमवेत बसून या विद्यार्थ्यांनी चित्रे पूर्ण केली. त्यांच्यामध्ये उत्साह दिसून आला. या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
चित्रकार राहुल रेपे, सूर्यकांत निंबाळकर, सागर बोंद्रे, नागेश हंकारे यांनी चित्रकलेची, तर राजेंद्र हंकारे यांनी सुलेखनाची आणि शिल्पकार प्रशांत धुरी यांनी शिल्पकलेची प्रात्यक्षिके सादर केली. अनेकांनी त्यांचे सादरीकरण आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेतले. सकाळी आमदार सतेज पाटील यांनी महोत्सवातील स्टॉलला भेट दिली. त्यांनी कलाकारांशी संवाद साधला.
दिवसभरात ज्येष्ठ चित्रकार विश्रांत पोवार, जी. एस. माजगावकर, अस्मिता जाधव, आदींनी महोत्सवाला भेट दिली. सुटीचा दिवस असल्याने सकाळी दहा वाजल्यापासून अनेकजण आपल्या कुटुंबीयांसमवेत, तर काही मित्र-मैत्रिणींसह महोत्सव पाहावयास आले. सायंकाळी पाचनंतर गर्दी वाढली. ‘संगीतसम्राट फेम’ प्रकाश साळोखे यांनी सॅक्सोफोन वादनाच्या माध्यमातून सूरमयी सफर घडविली.
कलाकारांकडून कलाकृतींची खरेदीया महोत्सवात सहभागी असलेले शिल्पकार संजीव संकपाळ आणि सतीश घारगे यांनी चित्रकार विजय टिपुगडे, बबन माने, सूर्यकांत निंबाळकर यांच्या चित्रांची खरेदी केली. चित्रकार जीवन कदम यांनी साकारलेले हरणांच्या चेहऱ्याचे शिल्प एका रसिकाने खरेदी केले. महोत्सव पाहण्यासह कलाकृती खरेदीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे निमंत्रक प्रशांत जाधव यांनी सांगितले.