कोल्हापूर : दारात रांगोळी, लाडक्या जिवा-शिवाच्या बैलजोडीची आंघोळ, शिंगांना आकर्षक रंग, गळ्यात घंटा, अंगावर छान झूल, पायात घुंगरू अशी सजावट, औक्षण, पुरणपोळीचा नैवेद्य आणि घरोघरी मातीच्या बैलजोडीचे पूजन अशा उत्साहात गुरुवारी कोल्हापूर शहर व जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा करण्यात आला. या सणानिमित्त नागरिकांनी शेतात राबणाऱ्या आणि घरात समृद्धता आणणाऱ्या या मूकप्राण्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी कर्नाटकी, तर काही ठिकाणी महाराष्ट्रीय (देशी) बेंदूर साजरा केला जातो. कोल्हापूर शहरासह पश्चिमेकडील काही गावे व सीमाभागातील गावात कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे सकाळपासूनच घरोघरी तयारी सुरू होती.
लाडक्या जिवा शिवाच्या बैलजोडीची आंघोळ, शिंगांना आकर्षक रंग, गळ््यात घंटा, अंगावर छान झूल, पायात घुंगरू अशी सजावट, औक्षण, पुरणपोळीचा नैवेद्य अशा उत्साहात गुरुवारी कर्नाटकी बेंदूर साजरा करण्यात आला. यानिमित्त पंचगंगा नदीघाटावर बैलांना छान सजवण्यात आले होते. (छाया : दीपक जाधव)
महिलांनी दारात सडा, रंगीबेरंगी रांगोळी घातली, दारात पिंंपळपानाचे तोरण बांधण्यात आले. ज्यंंच्या घरी बैल, गायी नाहीत अशा कुटुंबांनी कुंभारांनी बनविलेल्या मातीच्या बैलांची देव्हाऱ्यावर पूजा केली. त्यांना रंग लावून सजविण्यात आले होते. या बैलांनाच त्यांनी गोड नैवेद्य दाखविला.गाय, बैल असणाऱ्या शेतकऱ्यांनी सकाळी लवकर उठून बैल व गायींना पंचगंगा नदीसह पाणवठ्यांवर नेऊन स्वच्छ अंघोळ घातली. त्यांच्या शिंगांना रंगरंगोटी करून रंगीबेरंगी फुगे, गळ्यात फुलांच्या माळा बांधल्या. अंगावर विविध रंगांच्या झुली पांघरून बैलांना सजवले.
काही जणांनी बैलांच्या अंगावर गुलाल, अष्टगंध, झुल, घुंगरू, अशी सजावट करून हलगीच्या ठेक्यावर पंचगंगा नदीपासून मिरवणूक काढली. त्यानंतर घरात आल्यानंतर सुहासिनीनी बैलांचे औक्षण केले, पुरणपोळी, कडबोळ्यांचा नैवेद्य त्यांना खाऊ घालून कृतज्ञता व्यक्त केली. सीमाभागातही मोठ्या उत्साहात बेंदूर साजरा करण्यात आला. काही ठिकाणी सजविलेल्या बैलांच्या स्पर्धाही घेण्यात आल्या.