ठळक मुद्दे उत्तम कलाकृतीचा ध्यास ठेवा युवा कलाकारांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
कोल्हापूर : कलाकाराने निर्माण केलेल्या कलाकृतीमागे एक विचार, भावना आणि त्याचे सर्वांगाने केलेले निरीक्षण असते. समोरच्या व्यक्तीला एखादी कलाकृती साधी वाटू शकते तिची अर्थपूर्ण निर्मिती करणे कलाकाराचे खरे कसब असते त्यासाठी उत्तम कलाकृतीचा ध्यास ठेवा आणि त्या दिशेने प्रयत्न करा असा यशााचा कानमंत्र युवा कलाकार गौरीश सोनार व लेबल फिलीप यांनी गुरूवारी विद्यार्थ्यांना दिला.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनच्या कलादालनात रा. शी. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाच्यावतीने सुरू असलेल्या कला प्रदर्शनांतर्गत गुरूवारी गौरीश सोनार व लेबल फिलीप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनच्या कलादालनात रा. शी. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाच्यावतीने सुरू असलेल्या कला प्रदर्शनांतर्गत त्यांनी उपयोजित कलाक्षेत्र आणि संधी या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने जाहीर केलेल्या लोगो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला गौरीश सोनार म्हणाला, लोगो जितका साधा तितका प्रगल्भ असतो. देवस्थानचा लोगो बनवताना मंदिराची रचना, इतिहास, पंचमहाभूतांचे स्थान, श्रद्धा आणि देवालयांच्या स्थापनेमागील विचार या सगळ््याचा अभ्यास करून मी लोगो बनवला. निरीक्षण, सराव, नावीण्य कौशल्य, बुदधीचातूर्य आणि बाजारपेठेची मागणी याचा अभ्यास असलेला कलाकार यशस्वी होतो.मोठ्या कंपन्यांच्या ब्रँंडिंग आणि लोगोचे काम करणारा लेबल फिलीप म्हणाला, या क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्यांनी मी काय करतोय, कशासाठी आणि कोणासाठी करतोय या तीन प्रश्नांची उत्तरे शोधली की तो यशस्वी कलाकार बनतो. जाहिरात किंवा एखाद्या कंपनीचे ब्रॅन्डिंग ही एक कला आहे.
आपल्यासमोरच्या ग्राहकाला आणि त्याच्या अपेक्षित ग्राहकाला काय हवे आहे याचा विचार करणारा दुवा म्हणून कलाकृती पुढे येते. वाचन, निरीक्षण आणि कलाकाराच्या नजरेतून चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला हे कौशल्य साध्य होईल.सायंकाळच्या सत्रात मानसिंग टाकळे यांनी संकलित केलेल्या झेडबुक वुईच या जगप्रसिद्ध निसर्ग चित्रकाराच्या प्रात्यक्षिकांचा ‘स्लाईड शो’ दाखवण्यात आला. वैशाली पाटील यांनी सुत्रसंचलन केले.