कोल्हापूर: मराठा आरक्षण आंदोलनात दैनिक लोकमत आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, त्याबद्दल अभिनंदन. आता असेच पाठबळ सर्कीट बेंच आंदोलनासाठीही मिळू दे, कोल्हापुरात सर्कीट बेंच व्हावे म्हणून आवाज उठवावा अशी अपेक्षा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने व्यक्त केली.मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर शनिवारी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर शहर कार्यालयात सदिच्छा भेट देउन सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संपादक वसंत भोसले यांनी शुभेच्छांचा स्विकार केला.
शिष्टमंडळात जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.प्रशांत चिटणीस, उपाध्यक्ष अॅड. आनंदराव जाधव, माजी अध्यक्ष अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. अजित मोहिते, महिला प्रतिनिधी अॅड. मनिषा पाटील, अॅड. दिपाली जाधव यांचा समावेश होता.शहर कार्यालयात शुभेच्छांचा स्विकार केल्यानंतर झालेल्या चर्चेत मराठा आरक्षणाच्या आजवरच्या लढाईत दैनिक लोकमतने कायमच सहकार्याची आणि आंदोलकांना उमेद देण्याची भूमिका समर्थपणे निभावली असे गौरवोद्गार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस व माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे यांनी काढले.
तुमच्या पाठबळावर आरक्षणाची लढाई जिंकली आहे, आता कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्कीट बेंच व्हावे म्हणून सुरु असलेल्या लढ्यातही असेच सहकार्य मिळू दे अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्कीट बेंच व्हावे म्हणून लढा तीव्र केला जाणार आहे.