गडहिंग्लज : संपूर्ण कोल्हापूर शहर केरोसिनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला शंभर टक्के यश आले आहे. त्यामुळे दरमहा तब्बल साडेतीन कोटींची बचत होत असून, चंदीगड व दिल्लीनंतर कोल्हापूर हे देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर ठरले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आगवणे म्हणाले, दरमहा जिल्ह्यातील चार लाखांहून अधिक कुटुंबांना सुमारे १३ हजार मेट्रिक टन धान्य वितरित केले जाते. ई-पॉझ मशीनवरील बायोमेट्रिक रेशनिंग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे साधारणपणे १० टक्के धान्याची बचत होऊन हजारो कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होताहेत. त्याबरोबरच वितरण व्यवस्थेत कमालीची पारदर्शकता आली असून, सर्व प्रकारच्या गैरप्रकारांनाही आळा बसला आहे.
स्वेच्छेने रेशन धान्य नाकारणाºयांची संख्या कमी असली तरी पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे धान्य वेळेत उपलब्ध करून देण्याबरोबरच सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक बळकट करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तद्वत, गावागावांतील रास्त भाव दुकाने भविष्यात ‘मिनीबँक’ म्हणून काम करतील. ३० सप्टेंबरपर्यंत शिधापत्रिकांना आधारकार्ड लिंक करण्याची मुदत आहे. त्यानंतर आधारकार्ड शिधापत्रिकेला न जोडल्यास धान्य बंद होण्याची शक्यता आहे.
‘द्वार वितरण’ पद्धतीच्या माध्यमातून रेशनिंगचे धान्य थेट रास्त भाव दुकानदारांच्या दुकानात पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे वाहतूक, हमाली व गोदामावरीलदेखील खर्च कमी होऊन आणखी बचत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘कोल्हापूर पॅटर्न’मुळे राज्य आघाडीवर..!आंध्र व हरियाणानंतर बायोमेट्रिक रेशनिंगच्या ‘कोल्हापूर पॅटर्न’च्या धर्तीवर अन्य जिल्ह्यांतदेखील ही योजना राबविण्यात आल्यामुळे त्याचा राज्यभरातून उठाव झाला आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील आदर्शवत राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होऊ लागली.किंबहुना, ‘कोल्हापूर पॅटर्न’मुळेच राज्य आघाडीवर जाण्यास मदत झाली, त्याचे श्रेय कोल्हापूरकरांना जाते, असेही आगवणे यांनी नम्रपणे नमूद केले.