कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात गुरुवारी खंडेनवमी अर्थात विजयादशमी साजरी होत आहे. यानिमित्त श्री अंबाबाईची रथातील पूजा बांधण्यात येईल. सायंकाळी सहा वाजता ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा होणार आहे; तर मुहूर्ताच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता गुरुवारी होणार आहे. यंदा खंडेनवमी आणि विजयादशमी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने खंडेनवमीची शस्त्रपूजा व विजयादशमीचा दसरा सोहळा आजच होणार आहे.
अंबाबाईच्या जागराच्या होमामुळे आज सकाळी नऊ वाजल्यानंतर अंबाबाईचे दर्शन सुरू होईल. दसऱ्याला देवस्थान समितीच्या वतीने श्री अंबाबाई, महाकाली व महासरस्वती या तीनही देवतांना मानाची साडी अर्पण करण्यात येणार आहे. या साडीवरच श्री अंबाबाईची रथातील सालंकृत पूजा बांधली जाईल.सायंकाळी पाच वाजता तोफेच्या सलामीनंतर श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती पालखीत विराजमान होऊन आपल्या लवाजम्यानिशी निघेल. त्याचवेळी गुरुमहाराज व श्री तुळजाभवानी देवीची पालखीही दसरा चौकासाठी प्रस्थान करील.
न्यू पॅलेसमधून शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांचे मेबॅक कारमधून दसरा चौकात आगमन होईल. पालख्यांचे दसरा चौकात आगमन झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता देवीची आरती होईल. शाहू छत्रपतींच्या हस्ते शमीपूजन झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल.त्यानंतर पालख्या परतीच्या मार्गाला लागतील. श्री अंबाबाईची पालखी सिद्धार्थनगर, पंचगंगा घाट येथून रात्री मंदिरात परतेल. यानिमित्त झेंडूची फुले, लव्हाळा या पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.
झेंडूची फुले २० रुपये पाव किलो, तर लव्हाळा, आपट्याची पाने १० रुपयांना विकली जात होती. शहरातील मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, महाद्वार रोड, जोतिबा रोड, बिंदू चौक, बिनखांबी गणेश मंदिर या प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी लोटली होती.
मुहूर्तासाठी बाजारपेठा सज्ज
वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्ताच्या खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, होम अप्लायन्सेस, फर्निचर, दुचाकी-चारचाकी वाहनांचे शोरूम, गुजरीसह ब्रॅँडेड अलंकारांची शोरूम्स सजविण्यात आली आहेत. अनेक कंपन्यांनी या वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक सूट व भरघोस बक्षीस योजना जाहीर केली आहे.