कोल्हापूर : नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १ ते ४ आक्टोंबर २0१८ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. किर्लोस्कर आॅईल इंजिनचे व्ही. एम. देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अनिल अवचट यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या या महोत्सवाची ‘प्रदूषण रोखा, नदी वाचवा’ही संकल्पना असून, यावर आधारित विविध उपक्रम यानिमित्ताने होणार आहेत. या महोत्सवामध्ये ३५ हून अधिक चित्रपट दाखविण्यात येणार असून, याचबरोबर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ९ संस्था आणि व्यक्तींचाही गौरव यावेळी करण्यात येणार असल्याचे पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी सांगितले.‘वस्त्रोद्योग व नदी प्रदूषण’ हा परिसंवाद इचलकरंजी येथील डीकेटीई येथे होणार असून, ‘नदी प्रदूषण रोखण्यासाठी तंत्रज्ञान’ या विषयावर परिसंवाद तर ‘नदी प्रदूषणाची कारणे आणि उपाय’ या विषयावर युवासंसद होणार आहे. याच विषयावर पोस्टर प्रदर्शन स्पर्धाही घेण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘रिव्हर अँड फन’,‘ पर्यावरणपूरक सजावट’ उपक्रम घेण्यात येणार असल्याचे राहुल पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाऊसाहेब सूर्यवंशी, अॅड. केदार मुनीश्वर, अनिल चौगुले, विजय टिपुगडे उपस्थित होते.
पर्यावरणपूरक वस्तूंना प्राधान्यया महोत्सवामध्ये फ्लेक्स, प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर अजिबात करण्यात येणार नाही. कार्यक्रम स्थळावरील सर्व फलक हे कापडी राहणार असून, यामुळे कलाकारांनाही काम करण्याची संधी मिळणार असल्याचे उदय गायकवाड यांनी सांगितले.