कोल्हापूर : प्रकल्प आधारित अध्ययन व गुणवत्तापूर्ण शिक्षण या क्षेत्रातील कामासाठी केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाने पाऊल टाकले आहे. यासाठी रायगडमधील सीटीआयएफ विश्वनिकेतन नेटवर्कसमवेत केआयटीने सामंजस्य करार केला असल्याची माहिती केआयटीचे संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी यांनी दिली.या करारावेळी सीटीआयएफ विश्वनिकेतन नेटवर्कच्यावतीने उपाध्यक्ष संदीप इनामदार, संचालिका जान्हवी इनामदार, केआयटीचे संचालक डॉ. कार्जिन्नी, एम.एम. मुजुमदार, एम. एस. चव्हाण, वाय. एम.पाटील, एस.एस.माने उपस्थित होते.
या करारासाठी केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनिल कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले आणि इतर संचालकांचे मार्गदर्शन लाभले. या करारांतर्गत दरवर्षी काही ठराविक प्राध्यापकांना विश्वनिकेतनमध्ये पीएचडीची संधी प्राप्त होणार आहे. भविष्यातील सदृढ अभियंता घडविण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रमांची शृंखला नियोजित आहे.
सीटीआयएफ विश्वनिकेतन नेटवर्कच्या तज्ञांबरोबर केआयटीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांना संयुक्त संशोधन प्रकल्प राबविता येतील. परदेशातील अनेक विद्यापीठांशी सामंजस्य करार असलेले व उच्च शिक्षण, संशोधन, विद्यार्थ्यांना परदेशात संधी, पीएचडी, फेलोशीप या क्षेत्रात अनुभव असणारे व मार्गदर्शन करणारे असे हे सीटीआयएफ विश्वनिकेतन आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा केआयटीचे विद्यार्थी व प्राध्यापकांना व्हावा या उद्देशाने हा करार करण्यात आला असल्याची माहिती डॉ. कार्जिन्नी यांनी दिली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शनया सामंजस्य कराराअंतर्गत प्राध्यापकांच्या ज्ञान व कौशल्यामध्ये वाढ होण्यासाठी विविध कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. प्रकल्पांवर आधारित उपक्रमावर भर देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. आर्थिक, शैक्षणिक प्रशासकीय सुधारणांसाठी विश्वनिकेतन केआयटीला मार्गदर्शन आणि सहकार्य करणार असल्याचे डॉ. कार्जिन्नी यांनी सांगितले.